अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, अयोध्या नगरी राममय झाली असून आजपासून मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या विधीलाही सुरुवात झाली आहे. अयोध्येत लाखो भाविकांचा मेळा जमणार आहे. तर, ११ हजार व्हिआयपी पाहुण्यांनी अयोध्या नगरी दुमदुमणार आहे. अयोध्येसह देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा होत आहे. मात्र, सर्वांचे लक्ष अयोध्येकडे लागले आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांना अयोध्या नगरीचे हवाई दर्शन घडवण्याची तयारी उत्तर प्रदेश सरकारने सुरू केली आहे.
अयोध्येत रामभक्त आणि पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून अयोध्या नगरी पाहता येणार आहे. राज्यातील ६ जिल्ह्यातून ही हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते लखनौ येथून अयोध्या नगरीच्या हवाई दर्शनाची सुरूवात होणार आहे. सरकारकडून त्यासाठी हवाई सेवा देणाऱ्या ऑफरेटरची नियुक्ती करण्यात आली आहे. गोरखपूर, वाराणसी, लखनौ, प्रयागराज, मथुरा आणि आग्रा येथून ही हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येत आहे. आगामी काळात इतरही जिल्ह्यातून या सेवेला सुरूवात करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. राज्य सरकारकडून पर्यटन विभागाला या सेवेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी, प्रवाशांना, भाविकांना अगोदरच बुकींग करावे लागणार आहे.
राम मंदिर एरियल दर्शनासाठी भाडे किती?
पर्यटन विभागाचे प्रमुख सचिव मुकेश मेश्राम यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामभक्तांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, ६ जिल्ह्यात ही सेवा सुरू करण्यात येत आहे. पर्यटकांच्या ऑपरेटर मॉडेलनुसार ही सेवा सुरू करण्यात येत आहे. त्याद्वारे पर्यटकांना अयोध्येतील राम मंदिराचे एरियल दर्शन करता येईल. त्यासाठी, रामभक्तांना शरयू नदीच्या घाटावर असलेल्या टुरिझ्म गेस्ट हाऊसजवळील हेलिपॅडवरुन उड्डाण करतील.
या सवाई सेवेत भाविकांना राम मंदिर, हनुमानगढ़ी, शरयू घाटसह अयोध्येतील प्रसिद्ध दर्शनीय स्थळांना पाहता येईल. जास्तीत जास्त १५ मिनिटांसाठी ही सफर असणार आहे. त्यासाठी, भाविकांकडून प्रति व्यक्ती ३५३९ रुपये भाडे आकारले जाईल. एका हेलिकॉप्टरमधून ५ भाविकांना अयोध्या दर्शन होईल. त्यासाठी, वजनाची मर्यादा ४०० किलोपर्यंत असणार आहे. तर, एका भाविकास जास्तीत जास्त ५ किलोचे वजनाचे साहित्य सोबत घेता येईल.
दरम्यान, गोरखपूर येथून हवाई सफर करणाऱ्या भाविकांना ११,३२७ रुपये भाडे द्यावे लागेल. कारण, हे अंतर १२६ किमी असून त्यासाठी ४० मिनिटांचा हवाई प्रवास होणार आहे.