कानपूर - उत्साहाच्या भरात माणूस काय करेल याचा नेम नाही. कधी कधी सिनेस्टाईल कृती करताना किंवा हिरोगिरी दाखवताना ती माणसांच्या चांगलीच अंगलट येते. उत्तर प्रदेशातील कानपूर पोलिसांनी एका युवकावर कारवाई करत तब्बल २२,५०० रुपयांचा दंड ठोठवला आहे. फूल और काँटे चित्रपटातील अजय देवगणस्टाईलप्रमाणे या युवकाने दोन स्कॉर्पिओवर पाय ठेऊन रस्त्यावर एंट्री केल्याचं दिसून आलं. त्यामुळे, कानपूर पोलिसांनी दोन्ही स्कॉर्पिओसाठी २२,५०० रुपयांचा दंड केला आहे.
कारमालकांनी दंडाची रक्कम न भरल्यास त्या दोन्ही कार जप्त करण्यात येतील, असेही बजावले आहे. दरम्यान, यापूर्वीही दोन्ही कारवर दंडा ठोठावण्यात आला असून अद्यापही त्यांनी दंडाची रक्कम भरली नसल्याचं दिसून येत आहे. या दोन्ही स्कॉर्पिओवर अवैध नंबर प्लेट लावण्यात आली आहे. अजेंद्रसिंह नामक व्यक्तीच्या ह्या कार असून या दोन्ही कारच्या बोनेटवर उभे राहून त्याने अजय देवगण स्टाईल एंट्री केली होती.
पोलिसांनी, यातील एका स्कॉर्पिओवर एचएसआरपी नंबर प्लेट नसल्याने ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला, तर दुसऱ्या कारवर नो पार्कींगमध्ये नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्याचा आणि चुकीची नंबर प्लेटसह विविध वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल १५,६०० रुपयांचा दंड यापूर्वीच प्रलंबित आहे. डीसीपी प्रमोद कुमार यांनी याबाबत सांगितले की, एमव्ही अॅक्टअंतर्गत दोन्ही गाड्यांचे चालान करण्यात आले आहे. दंडाची रक्कम गाडीमालकाने न भरल्यास दोन्ही गाड्या जप्त केल्या जातील, असा इशाराही कुमार यांनी स्पष्ट शब्दात दिला आहे.
दरम्यान, २२ जानेवारी रोजी हा व्हिडिओ बनविण्यात आला असून गाडीवर जय श्रीरामचे झेंडेही लावण्यात आले आहेत. दोन्ही स्कॉर्पिओवर स्टंट करतानाचा युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर, पोलिसांनी कारवाई केली आहे.