Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशात आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमध्ये असतानाच समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील लोकसभा जागावाटपाचा तिढा सुटला. समाजवादी पक्षाने काँग्रेसला १७ जागा देण्यास मान्यता दिली. यानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत.
काँग्रेस नेत्यांनी समजावादी पक्षाला भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. या निमंत्रणाला मान देत अखिलेश यादव भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत. भारत जोडो यात्रेत आम्ही सहभागी होणार आहोत. लवकरच काँग्रेसचा याबाबत एक विस्तृत कार्यक्रम येणार आहे. त्यानंतर आगरा येथे भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ, असे अखिलेश यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
प्रियांका गांधीची भूमिका ठरली महत्त्वाची
तत्पूर्वी, प्रियांका गांधी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर घरी पोहोचल्या तेव्हा त्यांनी अखिलेश यादव यांच्याशी फोनवर बोलून १७ जागांवर शिक्कामोर्तब केले. उर्वरित दोन जागा बदलण्यास सांगितले. अखिलेश यादव यांनी त्यांची यादी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवली होती. त्यानंतर खरगे यांनी अखिलेश यांना सांगितले होते की, राहुल गांधी यांना मुरादाबाद आणि बिजनौर या दोन जागा हव्या आहेत. त्यानंतर अखिलेश यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखिलेश यांनी भारत जोडो न्याय यात्रेत सहभाग घेतला नाही. अखेर प्रियांका गांधी यांनी अखिलेश यांच्याशी बोलून या आघाडीवर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील उत्तर प्रदेशमधील जागावाटपाचा अडथळा दूर झाला. दोन्ही पक्षांनी इंडिया आघाडीअंतर्गत जागावाटपाची औपचारिक घोषणा केली. या अंतर्गत राज्यातील ८० जागांपैकी काँग्रेस रायबरेली आणि अमेठीसह १७ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.