उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपामधील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेला आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे आमने सामने आल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या लखनौपासून दिल्लीपर्यंत बैठकांवर बैठका होत आहेत. वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपामधील या वादाचा फायदा घेण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी सुरू केला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही भाजपामधील या सत्तासंघर्षादरम्यान आपली चाल खेळत या असंतुष्टांना मान्सून ऑफर दिली आहे. ''१०० घेऊन या आणि सरकार बनवा’’, अशी ऑफर त्यांनी दिली आहे.
''१०० घेऊन या आणि सरकार बनवा’’ म्हणजेच १०० आमदारांना सोबत घेऊन या आणि समाजवादी पक्षासोबत उत्तर प्रदेशात सरकार बनवा, असे सूचक आवाहन या माध्यमातून अखिलेख यादव यांनी भाजपामधील असंतुष्टांना केले आहे. अखिलेश यादव यांनी ही ऑफर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना उद्देशून दिल्याचं बोललं जात आहे. योगी आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य यांच्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून मतभेद उफाळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अखिलेख यादव यांनी या वादावर खोचक टिप्पणी करत दिलेली ही ऑफर उत्तर प्रदेशच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
याआधीही अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भाजपामधील सत्तासंघर्षावर टीका केली होती. भाजपामध्ये खुर्चीसाठी चाललेल्या लढाईमुळे उत्तर प्रदेशातील शासन आणि प्रशासन कोलमडलं आहे. भाजपा इतर पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण करायचा. मात्र आता त्यांच्याच पक्षामध्ये अंतर्गत फोडाफोडी सुरू आहे. त्यामुळे भाजपा अंतर्गत वादात अडकत चालली असून, त्या पक्षामध्ये जनतेबाबत विचार करणारा कुणी राहिलेला नाही, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला होता.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तर प्रदेशमधील भाजपामध्ये सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केलेल्या विधानानंतर भाजपामधील मतभेद उघडपणे समोर आले होते. पक्ष संघटना ही सरकारपेक्षा मोठी असते. संघटनेपेक्षा मोठं कुणीच नाही. प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा गौरव आहे, असं विधान मौर्य यांनी केलं होतं, तेव्हापासून भाजपामधील हा सत्तासंघर्ष उघडपणे समोर आला आहे.