Banke Bihari Temple: उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे असलेल्या बांके बिहारी मंदिराबाबत अजब प्रकार समोर आला आहे. बांके बिहारी मंदिराची जमिनीची कब्रस्तान म्हणून नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, तहसिलदार कार्यालयाकडून उत्तर मागण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वृंदावनच्या प्रसिद्ध बांके बिहारी मंदिराच्या जमिनीची मालकी कब्रस्तानच्या नावावर नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरा जिल्ह्यातील छाता तहसीलदारांकडून उत्तर मागवले आहे. २००४ मध्ये महसूल नोंदीमध्ये बांके बिहारी महाराज मंदिराच्या जमिनीची मालकी कब्रस्तान म्हणून कशी नोंद झाली? याबाबत उत्तर देण्याचे निर्देश श्री बिहारी सेवा ट्रस्ट, मथुरा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. सौरभ श्रीवास्तव यांनी दिले.
जमिनीची कब्रस्तान म्हणून चुकीची नोंद
या याचिकेवरील पुढील सुनावणी आता १७ ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली आहे. बांके बिहारी महाराज मंदिराच्या जमिनीची कब्रस्तान म्हणून चुकीची नोंद करण्यात आल्याचे रिट याचिकेत म्हटले आहे. यासंदर्भात महसूल अधिकाऱ्यांना योग्य नोंदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी यासंदर्भात एक अर्ज आधीपासून प्रलंबित आहे, या गोष्टीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
दरम्यान, शाहपूर गावातील भूखंड १०८१ ची स्थिती महसूल अधिकाऱ्याने वेळोवेळी का बदलली? असा सवाल करत या कार्यवाहीची संपूर्ण माहिती देण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. शाहपूर गावात असलेला प्लॉट क्रमांक १०८१ हा मूळचा बांके बिहारी महाराज मंदिराच्या नावावर होता आणि हे १३७५-१३७७ एफ मधील अधिकारांच्या नोंदीवरून स्पष्ट होते, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.