Allahabad High Court rejects Jaya Prada's plea : अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी लोकसभा खासदार जयाप्रदा यांना अलाहाबाद हायकोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. जयाप्रदा यांच्याकडून अजामीनपात्र वॉरंट (NBW) रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळली आहे. सतत गैरहजर राहणे आणि भडकाऊ भाषणे करून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जयाप्रदा यांच्याविरुद्ध खटला चालू आहे. याप्रकरणी ट्रायल कोर्टाने जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
ट्रायल कोर्टाने जयाप्रदाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. याविरोधात जयाप्रदा यांनी अलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टाकडून त्यांना दिलासा मिळाला नाही. जयाप्रदा यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला. गुरुवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान जयाप्रदा यांच्या वकिलांनी सांगितले की, त्यांना काही नवीन तथ्ये आणि नवीन कागदपत्रांसह नवीन अर्ज दाखल करायचा आहे.
दरम्यान, याआधी गेल्या मंगळवारी स्थानिक एमपी-एमएलए कोर्टाने माजी खासदार जयाप्रदा यांना निवडणूक आचारसंहिता भंगाच्या एका प्रकरणात सतत गैरहजर राहण्याच्या आरोपावरून अखेर 'फरार' घोषित केले. तसेच, त्यांना करून पुढील महिन्यात 6 मार्चपर्यंत न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पाच वर्षांपूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान समाजवादी पक्ष सोडून भाजपाच्या उमेदवार झालेल्या जयाप्रदा यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपाखाली रामपूरमध्ये दोन खटले दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी रामपूरच्या विशेष एमपी-एमएलए कोर्टात झाली होती.