उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस ११ जागा लढविणार; अखिलेश यादवांनी जागावाटपाची घोषणा केली, काँग्रेस नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 01:58 PM2024-01-27T13:58:59+5:302024-01-27T14:00:46+5:30
Akhilesh Yadav- Congress Deal: काँग्रेस ११ आणि रालोद ७ अशा १८ जागा सपाने इंडिया आघाडीतील मित्रपक्षांना सोडल्या आहेत. उर्वरित जागांवर सपा लढणार आहे. म्हणजेच सपा ६२ जागांवर निवडणूक लढणार आहे.
पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये इंडिया आघाडीत काँग्रेसमुळे बिघाडी झालेली असताना उत्तर प्रदेशमध्येकाँग्रेसने ११ जागांवर लोकसभा निवडणूक लढण्याचे मान्य केले आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून यावर प्रतिक्रिया आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० जागा आहेत. य़ापैकी ११ जागा काँग्रेस लढणार असल्याचे पक्के झाल्याचे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे. सपा आणि रालोद यांच्यात काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीअंतर्गत जागांचे वाटप झाले होते. रालोद उत्तर प्रदेशमध्ये ७ जागा लढविणार आहे. काँग्रेस ११ आणि रालोद ७ अशा १८ जागा सपाने इंडिया आघाडीतील मित्रपक्षांना सोडल्या आहेत. उर्वरित जागांवर सपा लढणार आहे. म्हणजेच सपा ६२ जागांवर निवडणूक लढणार आहे.
काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये २३ जागा लढवायच्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये ममतांनी एकट्याने निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. यानंतर आपच्या मुख्यमंत्र्यांनी पंजाबमध्ये तसे संकेत दिले होते. बिहारमध्ये नितीशकुमारच भाजपासोबत जात असल्याने काँग्रेसवर मोठा दबाव आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यातूनच काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये माघार घेतल्याची शक्यता आहे.
अखिलेश यादव यांच्या 11 जागा देण्याच्या प्रस्तावावर काँग्रेस प्रदेश नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे. अखिलेश यादव यांचा हा एकतर्फी निर्णय असून तो त्यांना मान्य नाही, असे राज्यातील काँग्रेस नेतृत्वाने म्हटले आहे.