"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 03:54 PM2024-05-12T15:54:14+5:302024-05-12T15:57:53+5:30
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी अमेठीऐवजी या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपाने दिनेश प्रताप सिंह यांना येथून तिकीट दिले आहे.
Amit Shah Addresses Public Meeting In Raebareli : रायबरेलीतून कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (१२ मे) येथील जनतेला केले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावरही निशाणा साधला. अमित शाह म्हणाले, येथे (रायबरेली) अनेक लोकांनी मला सांगितले की, ही कुटुंबाची जागा आहे. मी प्रियंका गांधी यांचे भाषण ऐकत होतो, त्या म्हणाल्या की, मी माझ्या कुटुंबाकडे मतं मागण्यासाठी आलो आहे.
रायबरेलीच्या जनतेने गांधी आणि नेहरू घराण्याला वर्षानुवर्षे विजयी केले हे खरे आहे. पण येथून निवडून आल्यानंतर सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंब कितीवेळा रायबरेलीत आले आहे, असे म्हणत सोनिया गांधी आजारी आहेत, पण राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी आल्या का? असा सवाल अमित शाह यांनी केला. दरम्यान, रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. येथून काँग्रेसच्या सोनिया गांधी निवडणूक लढवत होत्या. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी अमेठीऐवजी या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपाने दिनेश प्रताप सिंह यांना येथून तिकीट दिले आहे.
राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत अमित शाह म्हणाले की, "राजकुमार आज इथं मतं मागायला आले आहे, तुम्ही इतकी वर्षे मतदान करत आहात, तुम्हाला खासदार निधीतून काही मिळाले का? त्यांनी सगळा पैसा खर्च केला, तुम्हाला मिळाला नाही तर गेला कुठे? ७० टक्क्यांपेक्षा जास्त खासदार निधी अल्पसंख्याकांवर खर्च करण्याचे काम सोनिया गांधींनी केले आहे."
पुढे अमित शहा म्हणाले की, "हे गांधी कुटुंब खोटं बोलण्यात माहिर आहे. आता आम्ही प्रत्येक महिलेला एक लाख रुपये देऊ असे सांगत आहोत. मी नुकताच तेलंगणातून आलो आहे, तेलंगणाच्या निवडणुकीत त्यांनी सांगितले होते की, आम्ही प्रत्येक महिलेला १५ हजार रुपये देऊ. राज्यातील महिलांनी त्यांच्या सरकारला निवडून दिले आणि त्यांनी १५ हजार रुपये काय, १५०० रुपयेही दिले नाहीत."