लखनौ - लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे विजय न मिळाल्याने आता भाजप अॅक्शन मोडवर आला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये बूथवार झालेल्या दगाफटक्यासंदर्भात आणि मतदानासंदर्भातील अहवाल प्रदेश मुख्यालयाने मागवला आहे. हा अहवाल सर्व पराभूत झालेल्या उमेदवारांनी आणि विजयी झालेल्या खासदारांनी पाठवला आहे. या अहवालात जिलाध्यक्षांपासून ते आमदार, एमएलसी आणि बूथ पर्यंतच्या अध्यक्षांची तक्रार करण्यात आली आहे.
प्रत्येक बुथचा अहवाल मागवला - या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात 75 जागांवर निवडणूक लढवली होती. यांपैकी केवळ 33 जागांवरच भाजपचा विजय झाला आहे. २०२९ मध्ये भाजपने एकूम ६२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी या जागा थेट अर्ध्यावर आल्या आहेत. यातच, स्थानिक पातळीवर संघटनेने आपल्याला मदत केली नही, असा आरोप केंद्र सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या साध्वी निरंजन ज्योती यांनी केला आहे. तसेच, पक्षातील अतर्गत दगाफटक्यामुळे पराभव झाल्याचा आरोप गाझियाबादच्या लोनीतील भाजप आमदार नंद किशोर गुर्जर यांनी केला आहे. काही लोकांनी दगाफटका केला आहे. संपूर्ण प्लॅनिंगने भाजपला पराभूत करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्लॅनिंगमध्ये काही अधिकाऱ्यांनीही मदत केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपने मागवलेल्या या अहवालाच्या आधारे लवकरच दहाहून अधिक जिल्ह्यांत, महानगर अध्यक्ष आणि प्रदेशातील टीममध्ये काही बदल केला जाऊ शकतो.
मुख्यमंत्री-उप मुख्यमंत्रीही जाणार दिल्लीत -भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, बृजेश पाठक आणि सर्व विजयी झालेल्या खासदारांनाही दिल्लीत बोलावले आहे. मुख्यमंत्री योगी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता दिल्लीत पोहोचतील. शुक्रवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत वाराणसीचे खासदार नरेंद्र मोदी यांना संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवडले जाईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर उत्तर प्रदेशसंदर्भात चर्चा होऊ शकते. भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, सीएम योगी, उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि ब्रिजेश पाठक राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन उत्तर प्रदेशच्या जागांवर विचारमंथन करू शकतात. याची संपूर्ण तयारीही करण्यात आली आहे.