पिलीभीत (उत्तर प्रदेश) : राजकीय नेते निवडणूक प्रचारसभांमध्ये विकास, आधुनिकीकरण आणि प्रगतीची आश्वासने देत असोत, पिलीभीत लोकसभा मतदारसंघातील सुमारे ३०० गावांतील नागरिकांचा अजूनही मानवजातीचा सर्वांत आदिम संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष म्हणजे माणूस आणि वन्यप्राणी संघर्ष.
बेंगाल टायगरचा (पॅन्थेरा टायग्रिस) अधिवास असलेल्या लगतच्या पिलीभीत व्याघ्र प्रकल्पातील वाघांशी ग्रामस्थांचा संघर्ष नित्याचाच आहे. कधी कधी या चकमकी जीवघेण्याही ठरतात. अधिकृत नोंदीनुसार, नोव्हेंबर २०१९ पासून या गावांतील २२ हून अधिक लोकांना वाघांनी ठार मारले आहे. नुकतेच ९ एप्रिलला भाजप उमेदवार जितीन प्रसाद यांच्या समर्थनार्थ पुरणपूर भागात राजकीय प्रचारसभा होण्याच्या काही तास आधी ५५ वर्षीय शेतकरी भोले राम यांना वाघाने जखमी केले. गेल्या सहा महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात भोले रामसह चारजणांचा या गावात मृत्यू झाला आहे.
नेत्यांची आश्वासने सुरू- पिलीभीतमध्ये या मृत्यूमुळे मनुष्य-प्राणी संघर्ष हा निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. - वाघांमुळे कायमच अस्तित्व धोक्यात आलेल्या गावकऱ्यांकडून वाघांना जंगलाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. - राजकीय पक्षांनाही याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि आश्वासने सुरू झाली आहेत.