एकीकडे मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधणारेच इंडिया आघाडी सोडून गेलेले असताना आता आणखी एका महत्वाच्या राज्यात आघाडीला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सपासोबत असलेल्या जयंत चौधरी यांच्या आरएलडीला भाजपाने ऑफर दिली आहे. सपा आणि आरएलडीमध्ये सुरु असलेल्या जागावाटपाच्या वादावरून या दोघांचे कोणत्याही फिस्कटण्याची शक्यता बळावली आहे.
सपाने सुरुवातीला आरएलडीला सात जागा देण्याचे कबुल केले होते. परंतु त्यातही तीन जागांवर आपले उमेदवार आरएलडीच्या चिन्हावर लढविण्याची मागणी सपाने केली होती. यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु झाला आहे. यातच भाजपाने आरएलडीला चार जागांवर लढण्याची ऑफर दिली आहे.
भाजपाने ज्या चार जागांची ऑफर दिली आहे त्यात कैराना, बागपत, मथुरा आणि अमरोहा या जागांचा समावेश आहे. तर समाजवादी पक्षाला मुजफ्फरनगर, कैराना, बिजनौर या जागांवर आरएलडीच्या चिन्हावर आपले उमेदवार लढवायचे आहेत. चौधरी आणि अखिलेश यादव यांच्यात आधी झालेल्या जागावाटपानुसार सात जागांवर डील झाली होती. याची माहिती खुद्द यादव यांनी दिली होती. या जागांमध्ये मेरठ, बिजनौर, अमरोहा, नगीना, फतेहपुर सीकरी या जागांसह अजून दोन जागा आरएलडीला सोडण्यात येणार होत्या.
आरएलडी आणि सपाची मैत्री २०१८ पासूनची आहे. कैराना लोकसभा सीटवरील पोटनिवडणुकीत सपाने आरएलडीच्या तिकीटावर तबस्सुम हसन यांना उतरविले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आरएलडीसोबत आघाडी करून सपाने निवडणूक लढविली होती. तीनपैकी एकाही जागेवर आरएलडी जिंकली नव्हती. पुढे विधानसभेत सपाने आरएलडीला ३३ जागा दिल्या होत्या. यापैकी ९ ठिकाणी आरएलडीचे उमेदवार जिंकले होते.