लखनौ : मुघल शासक औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याबद्दल आमदार अबू आझमी यांची समाजवादी पक्षाने पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केली आहे. अबू आझमी यांना उत्तर प्रदेशमध्ये आणा; अशा लोकांची ‘काळजी’ घेण्याचे उत्तर प्रदेशला चांगलेच माहिती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेश विधान परिषदेत योगी म्हणाले की, सपने या वादावर भूमिका निश्चित केली पाहिजे. त्या व्यक्तीला पक्षातून काढल्याची अधिकृत घोषणा केली पाहिजे. त्यांना उत्तर प्रदेशात पाठवा. बाकीची ‘काळजी’ आम्ही घेऊ. औरंगजेबाला नायक मानणाऱ्यांना भारतातही राहण्याचा अधिकार नाही.
सपवर दुटप्पीपणाचा आरोप करताना मुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे तुम्ही कुंभमेळ्यावर टीका करता आणि दुसरीकडे औरंगजेबाचा गौरव करता. तो एक निर्दयी शासक होता. त्याने मंदिरे उद्ध्वस्त केली. त्याचे उदात्तीकरण करणाऱ्या नेत्याविरुद्ध कारवाई करण्यापासून दूर का पळत आहात?
ज्याची जशी दृष्टी, त्याला तसा महाकुंभ दिसला
४५ दिवसांचा महाकुंभ गुन्हेगारीमुक्त राहिला. ही सामाजिक शिस्त नाही तर काय आहे, असा सवालही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ज्याची जशी दृष्टी तसा त्याला महाकुंभ दिसला, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
महाकुंभामध्ये ६६ कोटी ३० लाखांपेक्षा जास्त भाविक आले. या ४५ दिवसांत प्रयागराजमध्ये असो की उत्तर प्रदेशमध्ये असो; कोणतीही लुटालुटीची किंवा अपहरणाची घटना घडली नाही. त्याचप्रमाणे इतरही गैरप्रकार घडले नाहीत. एकात्मतेचे यापेक्षा चांगले उदाहरण आणखी कोणते असू शकते? जातींच्या सीमा तुटून पडल्या. जाती, पंथ, संप्रदाय, विभाग, देश या सर्व सीमा गळून पडल्या. वसुधैव कुटुंबकमचा भाव जागृत करून महाकुंभने जगाला नवा संदेश दिला आहे.