अयोध्येतील बलात्कार प्रकरण आता अधिकाधिक भडकताना दिसत आहे. यामुळे समाजवादी पक्षाची अडचण होताना दिसत आहे. आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणावरून सपावर थेट निशाणा साधला आहे. योगी म्हणाले, अयोध्येतील अल्पवयीन मुलीवर बालात्कार केल्याचा आरोप असलेली व्यक्ती सपा खासदारासोबत उठते-बसते आणि पक्ष तिच्यावर कसलीही कारवाई करत नाही. एवढेच नाही तर, मी येथे प्रतिष्ठेसाठी आलेलो नाही. ती मला अपल्या मठातही मिळाली असती. मी येथे यासाठी आलो आहे की, जर त्यांनी (अपराधी) केले, तर भोगावे लागेल.
अशा गुन्हेगारांन गोळी घालायची नाही तर... -उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणावरून समाजवादी पक्षावर भरविधानसभेत हल्ला चढवला. योगी म्हणाले, "अयोध्येत 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचे समाजवादी पक्षाशी संबंध आहेत. आरोपी सपा खासदाराच्या जवळचा आहे. आरोपीने मागास समाजातील मुलीवर बलात्कार केला आणि तो समाजवादी पक्षाच्या खासदारासोबत फिरत होता. समाजवादी पक्षाने त्या आरोपींवर कोणतीही कारवाई केलेली नाही." एवढेच नाही तर, "अशा गुन्हेगारांना गोळी घालायची नाही, तर काय हार घालायचा का?" असा सवालही योगी आदित्यनाथ यांनी केला.
सपा नेत्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप -समाजवादी पक्षाचा नेता मोईन खानवर 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिच्या पोटात दुखू लागले. यानंतर कुटुंबीयांनी तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची पुष्टी केली. यानंतर पीडितेने आई-वडिलांना संपूर्ण प्रकरण सांगितले. अल्पवयीन मुलगी ही निषाद कुटुंबातील आहे. आरोपी सपा नेता एका बेकरीचा मालक आहे. बेकरीमध्ये नोकरीचे अमिष दाखवत त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
व्हिडिओ तयार करून... -आरोपीने पीडितेवरील बलात्काराचा व्हिडिओ तयार करून तिला, कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. तो तिच्यावर दोन महिने बलात्कार करत होता. ही घटना अयोध्येतील पूराकलंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यातील एक समाजवादी पक्षाचा भदरसा नगराध्यक्ष आहे.