त्रियुग नारायण तिवारी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या : श्रीरामजन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठेसोबतच अयोध्येतील शरयू नदीत ‘पुष्पक विमान’ व ‘कनक महल’ नावाने क्रूझ व हाउस बोटसेवा सुरू करण्यात येणार आहे.
हाउस बोट व क्रूझचे संचालन करणाऱ्या कंपनीचे संचालक मनोज अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येत चौधरी चरणसिंह घाटापासून गुप्तार घाटापर्यंत क्रूझ व हाउस बोटचे संचालन होईल. दोन्ही घाटांवरील जागा निश्चित करून देण्यात आली आहे. क्रूझचे संचालन जानेवारी महिन्यापासून होईल, असा अंदाज आहे. अयोध्येच्या शरयू नदीत दोन वातानुकूलित क्रूझ व दोन हाउस बोटी सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी जय्यत तयारी सुरू आहे, अशी माहिती आहे. क्रूझच्या निर्मितीने वेग घेतला असून, ती संचालित करणाऱ्या कंपनीच्या संचालकांचे म्हणणे आहे की, गुप्तार घाट ते चौधरी चरणसिंह घाटापर्यंत क्रूझ चालविली जाईल.
सांस्कृतिक कार्यक्रम व रात्रीचा मुक्कामही
भाविकांना गरज भासल्यास रात्रीच्या मुक्कामाचीही सोय आहे. हाउस बोटमध्ये ऑडिओ व व्हिडीओद्वारे प्रभू श्रीराम यांच्या कथा दाखवल्या जातील. प्रत्येक ट्रिपमध्ये १५ मिनिटांचा सांस्कृतिक कार्यक्रमही दाखवला जाईल.
दुबईतील कंपनी करणार संचालन
क्रूझचे नाव ‘पुष्पक विमान’ व हाउस बोटचे नाव ‘कनक महल’ ठेवण्यात आले. योजनेवर १८ कोटी रुपये खर्च होत आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी दुबईतील एक कंपनी व अयोध्या नगरपालिका यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे.