लखनौ : अयोध्येत येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सहा हजारांहून अधिक लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसेच, अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्यातील अनेकजण अयोध्येला जाणार आहेत तर अनेक नेत्यांनी हे निमंत्रण नाकारले आहे. दरम्यान, निमंत्रण नाकारल्याने वाद निर्माण झाला आहे.
यासंबंधित प्रश्नाला उत्तर देताना उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, मला निमंत्रण मिळालेले नाही. अखिलेश यादव यांनी शुक्रवारी लखनौमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अखिलेश यादव म्हणाले की, अयोध्येत होणाऱ्या प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मला वैयक्तिकरित्या किंवा कुरिअरद्वारे निमंत्रण मिळालेले नाही. तसेच, कुरिअरद्वारे निमंत्रण पाठवले असल्यास त्याची पावती त्यांना दाखवावी, जेणेकरून आमंत्रण योग्य पत्त्यावर पाठवले गेले आहे की नाही हे कळू शकेल, असेही अखिलेश यादव यांनी सांगितले.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला निमंत्रित केल्याच्या प्रश्नावर अखिलेश यादव म्हणाले, "भाजपचे लोक इतरांचा अपमान करण्याचे काम करतात. मला कोणतेही निमंत्रण मिळालेले नाही. जेव्हा आम्ही कोणताही कार्यक्रम करतो तेव्हा आमच्या ओळखीच्या लोकांनाच आमंत्रित करतो. आम्ही कोणालाही आमंत्रित करत नाही. आम्हाला कोणतेही निमंत्रण देण्यात आलेले नाही." यादरम्यान, या एका पत्रकाराने सांगितले की, कुरिअरद्वारे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यावर अखिलेश म्हणाले, "आता ही बाब समोर येत आहे. मला कुरिअरद्वारे आमंत्रण पाठवले आहे. मी तुम्हाला कुरिअरची पावती मिळवून देण्यास सांगतो जेणेकरून आमंत्रण आमच्या पत्त्यावर येत आहे की, दुसऱ्या पत्त्यावर जात आहे, हे आम्हाला कळू शकेल."
तत्पूर्वी, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांना विचारण्यात आले की,अखिलेश यादव यांना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले, "निमंत्रण त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे की नाही हे मी सांगू शकत नाही, परंतु त्यांचे नाव निमंत्रण यादीत आहे." दुसकीकडे, काँग्रेस हायकमांडनेही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले आहे.