उत्तर प्रदेशातील बलिया येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. 25 जानेवारीला 568 जोडप्यांचं लग्न झालं. मात्र यामध्ये नवरदेवाशिवाय मोठ्या संख्येने वधूंचं लग्न लावण्यात आलं. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये काही वधूंनी स्वतःच स्वत:ला हार घातला आहे. सध्या या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत सरकार 51 हजार रुपये देते. प्रत्येक जिल्ह्यात लग्न समारंभाचं आयोजन केलं जातं. याच क्रमाने बलिया जिल्ह्यात 568 जोडप्यांचं लग्न पार पडलं. मात्र तो एक घोटाळा असल्याचं आता समोर आलं आहे. शेकडो नववधूंचं नवरदेवाशिवाय लग्न झालं आहे. अनेक तरुणी स्वतःच्या हातांनी स्वतःच्या गळ्यात हार घालतात.
चौकशी केली असता, यातील अनेक तरुणी याठिकाणी भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांना पैशाचं आमिष दाखवून सामूहिक विवाह योजनेत सहभागी होण्यासाठी तयार केलं. कागदपत्रावर नाव लिहून सरकारी तिजोरीतून पैसे काढून घेण्यासाठी हे सर्व केल्याचं समोर आलं आहे.
या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी बांसडीह विधानसभेतील भाजपा आमदार केतकी सिंह यांनी सांगितलं की, या घटनेची दखल घेत आहे. कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही. हा गरिबांशी केलेला खेळ आहे. जिल्हा प्रशासनाने तपास पथकही तयार केलं आहे. एफआयआर करण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या 20 सदस्यांचे पथक तपास करत असल्याचे सीडीओने एका निवेदनात म्हटलं आहे. मुख्यमंत्री समूह विवाह योजनेंतर्गत मिळणारा निधी तातडीने बंद करण्यात आला आहे. आतापर्यंत 20 लोकांच्या तपासणीत 8 जण बनावट असल्याचं निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून वसुली केली जाईल.