उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सुनेच्या प्रसूतीवेळी एयर कंडीशन रुम बुक न केल्यामुळे सासरचे आणि माहेरचे एकमेकांशी भिडले आहेत. रुग्णालयाच्या गेटबाहेर मुलीचे वडील, मुलगा आणि नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. याप्रकरणी मुलाच्या बाजूने शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नगर कोतवाली परिसरातील सिव्हिल लाईन्स येथील एका खासगी नर्सिंग होमसमोर घडलं आहे. आवास-विकास कॉलनीतील रहिवासी रामकुमार यांनी सोमवारी पोलिसांत तक्रार दिली, की मुलाचे लग्न लखनौ जिल्ह्यातील फैजुल्लागंज पोलीस स्टेशन अलीगंज येथे झाले होते. सुनेच्या प्रसूतीसाठी तिला सिव्हिल लाईन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मुलगी जन्माला आली आणि रुग्णालयात जो काही खर्च झाला तो त्यांनी दिला.
सोमवारी मुलीच्या माहेरचे नातेवाईक, आई-वडील मुलीला पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले असता एसी नसलेली खोली पाहून त्यांना धक्काच बसला. एसी रूम बुक न केल्याने शिवीगाळ करू लागल्याचा आरोप रामकुमार यांनी केला आहे. नकार दिल्याने त्यांनी मला व माझी पत्नी व दोन्ही मुलींना बेदम मारहाण केली.
नर्सिंग होमच्या बाहेर रस्त्याच्या मधोमध मुलीचे वडील, मुलगा आणि नातेवाईकांनी मुलाची बहीण आणि पालकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे आई-वडील व बहिणीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. संजय मौर्य यांनी सांगितले की, कुटुंबाची तक्रार आली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.