लखनौ - सरकारी कार्यालयाच्या उदासिनतेची अनेक प्रकरणे आणि उदाहरणे आपण पाहिली आहेत. कागदावर असलेल्या वस्तू प्रत्यक्षात गायब असतात. किंवा प्रत्यक्ष लाभार्थी व्यक्तीला लाभ न होता दुसरेच शासकीय योजनेचे लाभार्थी बनलेले असतात. युपीतील मुजफ्फरनगरच्या जनपद बुढाना हद्दीतील बिराल निवासी ८२ वर्षीय वृद्ध गेल्या ६ वर्षांपासून सरकारी कार्यालयात चकरा मारत आहेत. विशेष म्हणजे मी जिवंत असल्याचं ते ओरडून आणि कागदी पुराव्यासह सांगताना दिसून येतात. मात्र, प्रशासन मुर्दाड अवस्थेत दिसून येतय.
हरयाणाच्या पानीपत येथे आपण राहत असून माझ्या लहान भावाने मला मृत दाखवत माझी गावाकडील जमीन हडप केली. संबंधित शासकीय कार्यालयात हेलपाटे मारुनही कुणीही दखल घेत नसल्याने पीडित वृद्धाने लखनौ येथील मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय.
बिराल निवासी रघुराज ह्यांचं सहा भावांसह मोठं कुटुंब गावी राहत होते. त्यापैकी तीन भावांचा मृत्यू झाला असून रघुराज यांच्यासह तिघेजण जिवंत आहेत. रघुराज सध्या हरयाणातील पानीपत येथे भाड्याने राहत असून मजुरी करुन जीवन जगत आहेत. त्यांचा मोठा भाऊ अमन हा गावात राहत असून त्याला दीड बिघा म्हणजे अर्धा एकरपेक्षाही कमी जमिन आहे. याच भावाने रघुराम यांचं खोटं मृत्यू प्रमाणपत्र दाखवून त्यांच्या नावावरील जमिन स्वत:च्या नावावर करुन घेतली.
दरम्यान, सहा वर्षांपूर्वी ते गावी आल्यानंतर त्यांना ही गोष्ट समजली. त्यामुळे, त्यांनी संबंधित सरकारी विभाग आणि महसूलकडे धाव घेतली. मात्र, कोणीही त्यांची तक्रार ऐकून दखल घेतली नाही. सरकारी कार्यालयातील अधिकारी मुर्दाड झाल्याचं हे जिवंत उदाहरण आहे. अखेर कुठेही दाद न मिळाल्याने रघुराज यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय.