उत्तर प्रदेशपोलिसांच्या टास्क फोर्सने एका सेवानिवृत्त सैन्य जवानाला अटक केली आहे. जो नकली अधिकारी सैन्य दलात कर्नल असल्याचे सांगत सैन्यभरतीसाठी लोकांची फसवणूक करत, त्यांच्याकडून पैशांची लूट करतो होता. गंगा नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आत्तापर्यंत बहुसंख्य युवकांना त्याने गंडा घातल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे या उद्योगातून आरोपीने तब्बल ४० कोटी रुपयांची संपत्ती जमा केल्याचंही चौकशीतून समोर आलं आहे.
एसटीएफकडून याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असून फेक कर्नलच्या मुलांचाही शोध घेण्यात येत आहे. या मुलांकडून कर्नलच्या मालमत्तेचा सांभाळ केला जातोय. सत्यपाल यादव असं या फेक कर्नलचं नाव असून पोलिस तपासात अनेक धक्कादायक खुलासे त्याने केले आहेत. त्यामुळे, पोलिसांनी सत्यपालसह देवेंद्र आणि प्रशांत या त्याच्या दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सत्यपालचे हे संपूर्ण कुटुंबच फसवणुकीचा गोरखधंदा करत होते. आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना नोकरीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची मागणी केली जात होती. काही वर्षातच त्यांनी या धंद्यासह इतरही फसवणुकीतून ४० कोटी रुपयांची संपत्ती जमा केल्याचं तपासात समोर आलंय. आत्तापर्यंत ३४ लोकांची फसवणूक झाली असून प्रत्येकाकडून १० ते १५ लाख रुपये घेण्यात आले आहेत. सत्यपाल जेव्हा सेवानिवृत्त झाला होता, तेव्हा त्याच्या बँक खात्यात ४ लाख ३० हजार रुपये होते.
कर्नलचा युनिफॉर्म परिधान करुन तो लोकांची फसवणूक करायचा, त्यातूनच त्याने ४० कोटींची संपत्ती जमवल्याचे दिसून येते. सत्यपाल हा स्वत:ला सैन्य भरती बोर्डाचा कर्नल असल्याचे सांगत विविध राज्यातील तरुणांची आर्थिक फसवणूक करत होता. पोलिसांनी सोमवारी त्यास अटक केली. त्यावेळी, त्याकडून ५ जॉईनिंग लेटर, ५ शिक्के, एक प्रिंटर, कर्नलचा युनिफॉर्म आणि ओळखपत्र ताब्यात घेण्यात आलं. सत्यपाल हा १० वी पास असून सैन्य दलातील नायक पदावरुन २००३ साली निवृत्त झालेला आहे.
एसटीएफचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) ब्रजेश सिंह यांनी मेरठच्या कसेरू बक्सर येथील यादवला आर्मी इंटेलिजेंस आणि एसटीएफ मेरठच्या संयुक्त पथकाने अटक केली. ब्रजेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सत्यपालच्या घरी छापा टाकल्यावर एक मुलगा तिथे आला होता. ज्याने त्याच्या बहिणीला एलडीएस क्लर्सपदाची नोकरी लावण्यासाठी १६ लाख रुपये सत्यपालला २ वर्षांपूर्वी दिले होते. सत्यपालने या नोकरीसाठीचे जॉईनिंग लेटरही संबंधितास दिले. मात्र, लखनौ येथील सैन्याच्या हेड ऑफिसला गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे, सैन्य दलातील अधिकारही सतर्क झाल्याचं सिंह यांनी सांगितलं.