बरेलीत मोठा गोंधळ अन् दगडफेक; तौकीर रझांच्या आव्हानानंतर हजारो समर्थक रस्त्यावर उतरले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 07:21 PM2024-02-09T19:21:05+5:302024-02-09T19:23:11+5:30
मौलाना तौकीर रझा यांनी हल्दवानी हिंसाचार आणि ज्ञानवापीवरील न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जेलभरोची घोषणा केली होती.
Bareilly News: बरेलीत मौलाना तौकीर रझा खान यांच्या 'जेल भरो'च्या आवाहनानंतर शहरातील परिस्थिती बिघडली आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर हजारो समर्थक रस्त्यावर उतरले. नमाजनंतर तौकीर रझा यांनी लोकांना संबोधित केले आणि अटक करुन घेण्यासाठी इस्लामिया ग्राउंडकडे जाण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्या समर्थकांना वाटेत अडवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी बॅरिकेड तोडले. यानंतर शाहमतगंज परिसरात दगडफेक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहामत गंज परिसरात दगडफेक झाली असून यामध्ये काही लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपींविरुद्ध एफआरआय दाखल करण्यात येणार आहे. सध्या घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
#WATCH | Bareilly, Uttar Pradesh | Chief of Ittehad-e-Millat Council, Bareilly Sharif, Maulana Tauqeer Raza detained by Police. He had given a call for 'Jail Bharo' over Gyanvapi matter. pic.twitter.com/pLunB4wltv
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 9, 2024
नेमकं काय प्रकरण आहे?
मौलाना तौकीर रझाने हल्दवानी हिंसाचार आणि ज्ञानवापीवरील न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जेलभरोची घोषणा केली होती. शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर ते आपल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरले असता पोलिसांनी त्यांना अडवले. मात्र, मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमा झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी तौकीर रझा म्हणाले की, देशात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमच्या मशिदी आणि घरांवर बुलडोझर चालवला जातोय. अशा परिस्थितीत आपली प्रार्थनास्थळे वाचवणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांसह शांततेने आपला निषेध नोंदवू. मात्र, यावेळी त्यांनी हल्द्वानी हिंसाचारावर सीएम धामी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले.
तौकीर रझा म्हणाले- "तुम्ही आमच्या घरावर बुलडोझर चालवलात तर आम्ही गप्प बसू का? आता कोणताही बुलडोझर खपवून घेतला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालय दखल घेत नसेल, तर आम्ही आमचे संरक्षण करू, कायद्याने आम्हाला अधिकार दिला आहे. कोणी आपल्यावर हल्ला केला, तर आपण त्याला मारले पाहिजे." यावेळी रझा यांनी पीएम मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यावरही आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि अपशब्दही वापरले.
सध्या बरेलीचे वातावरण चांगलेच तापले आहे. पोलीस प्रशासन अलर्टवर आहे. इस्लामिया मैदानावर 1000 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. एसपी, डीएसपी यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पीएसी आणि आरएएफलाही तैनात करण्यात आले आहे. अतिक्रमण हटाओ मोहिमेअंतर्गत उत्तराखंडच्या हल्दवानीमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर वातावरण तापले असताना हे सर्व घडत आहे. उत्तराखंड ते यूपीपर्यंत हाय अलर्ट आहे.