Ayodhya Ram Mandir , Yogi Adityanath : अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठेसाठी आता केवळ एक महिना उरला आहे. उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. या दरम्यान, गुरुवारी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने २२ जानेवारीला अयोध्येतील सर्व हॉटेल आणि धर्मशाळांचे प्री-बुकिंग रद्द केले आहे. VVIP सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
'त्या' दिवशी अयोध्येत कोण राहू शकणार?
मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी २२ जानेवारी रोजी हॉटेल आणि धर्मशाळांमध्ये आधीच केलेले बुकिंग रद्द केले जाणार आहे. गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. २२ जानेवारीला लोकांनी अयोध्येत आधीच मोठ्या प्रमाणात हॉटेल्स बुक केली आहेत. पण ती रद्द केली जातील. VVIP सुरक्षेचा विचार करून हे बुकिंग रद्द केले जाईल. २२ जानेवारीला केवळ तेच लोक अयोध्येत राहू शकतील, ज्यांच्याकडे ड्युटी पास किंवा श्री रामतीर्थ ट्रस्टचे निमंत्रण पत्र असेल.
निर्णयावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय म्हणाले?
या निर्णयाबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी काही लोकांनी स्थानिक हॉटेल आणि धर्मशाळा बुक केल्याचं समोर आलं आहे. सरकार आणि प्रशासनाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ती रद्द करावीत, कारण त्यादिवशी भारतातून विशेष निमंत्रित अयोध्येत येणार आहेत. अयोध्या विमानतळावर १०० विमाने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर सेवांचा विचार करून त्याची योग्य व्यवस्था लावावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
PM मोदींचा ३० डिसेंबरला अयोध्या दौरा
३० डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी सीएम योगींनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. धार्मिक नगरी अयोध्येला पंतप्रधान मोदींच्या हस्ते हजारो कोटींचे प्रकल्प भेट देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. ३० डिसेंबर रोजी राममय अवधपुरी येथे पंतप्रधान मोदींचे भव्य नागरी स्वागत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यानिमित्ताने त्रेतायुगातील वैभवानुसार अयोध्येची सजावट करण्यात येणार आहे.