Nitish Kumar Uttar Pradesh, Bihar Model vs Gujarat Model: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नजर २०२४ मधील लोकसभा निवडणुकीवर आहे. त्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा अंदाज घ्यायला सुरूवात केली आहे. तसेच नितीश कुमार यांनी यूपीमध्ये आपला राजकीय तळ बनवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी यूपी 2024 ची निवडणूक गुजरात मॉडेल विरुद्ध बिहार मॉडेल बनवण्याची तयारी सुरू केली आहे. नुकतेच बिहार सरकारच्या एका मंत्र्याने यूपीच्या हजारो मुलांना बिहारने नोकऱ्या दिल्या, गुजरात मॉडेल यूपीमध्ये अपयशी ठरल्याचे विधान केले. त्यानुसार नितीश कुमार यांची आता मोर्चेबांधणी सुरू आहे.
नितीश कुमार यांची 24 डिसेंबर रोजी वाराणसीतील रोहनिया येथे जाहीर सभा होणार आहे. पटेल व्होट बँकेच्या दृष्टिकोनातून वाराणसीतील रोहनिया परिसर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या जाहीर सभेतून नितीश कुमार यूपीमध्ये आपली उपस्थिती दाखवणार आहेत. जाहीर सभा यशस्वी करण्याची जबाबदारी नितीश यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या श्रवणकुमार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. श्रवणकुमार बनारसमध्ये तळ ठोकून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
२०२४ निवडणूक गुजरात विरुद्ध बिहार मॉडेल
जेडीयूने आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार बिहार विरुद्ध गुजरात मॉडेल म्हणून सुरू केला आहे. बिहारचे कॅबिनेट मंत्री श्रवण कुमार यांनी वाराणसीत सांगितले की, यूपीमधील डबल इंजिन सरकार आणि गुजरात मॉडेल दोन्ही अपयशी ठरले आहेत. देशातील वंचित, शोषित आणि गरिबांची आर्थिक दुर्दशा दूर करण्यास केवळ बिहार मॉडेलच सक्षम आहे. ते म्हणाले की, यूपीतील हजारो मुलांना बिहारमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत, हे बिहार मॉडेलचे योगदान आहे. उपजीविका देऊ न शकणारे सरकार गुजरात मॉडेलबाबत कोणत्या तोंडाने बोलत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.