भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत गौतम यांच्या कारला उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे अपघात झाला. अपघातानंतर त्यांना खासगी विद्यापीठ टीएमयूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भाजप नेते दुष्यंत गौतम हे दिल्लीला जात असताना राष्ट्रीय महामार्ग 9 वर हा अपघात झाला. या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली असून, ते धोक्याबाहेर आहे.
दुष्यंत गौतम शाजहानपूरहून दिल्लीला जात असताना मुरादाबाद बायपासवर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच मुरादाबादचे महापौर विनोद अग्रवाल आणि भाजपचे अनेक नेते दुष्यंत गौतम यांना पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.
भाजप नेते तथा मुरादाबादचे महापौर विनोद अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहजहांपूरहून दिल्लीला जात असताना दुष्यंत गौतम यांची गाडी उलटली. कार एका बाजूने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली, सुदैवाने कारचा दरवाजा उघडल्याने दुष्यंत गौतम खाली पडले. त्याच्या मणक्याला आणि कमरेला दुखापत झाली आहे. तसेच स्नायूंनाही दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना आठवडाभर बेड रेस्ट घेण्यास सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले होते.