I.N.D.I.A. Vs NDA: विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीपूर्वी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी कोणत्याही राजकीय आघाडीत समाविष्ट न होता, लोकसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. मायावती यांनी बसपा विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीमध्ये सामील होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र, यातच आता मायावती यांना भाजप नेत्यांकडून NDA मध्ये सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे बसपाच्या मायावती यांनी स्पष्ट केले. बसपा I.N.D.I.A. आघाडीमध्ये सामील होऊ शकते असे बोलले जात होते. NDA आणि I.N.D.I.A आघाडी बहुतेक गरीब विरोधी, जातीयवादी, सांप्रदायिक भांडवलशाही धोरणे असलेले पक्ष आहेत, ज्यांच्या धोरणांविरुद्ध भाजपा सतत लढत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत युती करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असेही मायावती म्हणाल्या. यावरून भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया देताना NDA मध्ये यावे, असे म्हटले आहे.
...म्हणून मायावती I.N.D.I.A. आघाडीत गेल्या नाहीत
मायावतींच्या विधानावर सपा नेत्या आणि प्रवक्त्या जुही सिंह टीका केली आहे. मायावती भाजपसोबत आहेत आणि त्यामुळे त्या I.N.D.I.A.चा भाग नाहीत. बाहेरून मायावती NDA ला फायदा करून देत आहेत. मायावती उमेदवाराला विजयी करण्यासाठी नाही, तर दुसऱ्याला पराभूत करण्यासाठी उमेदवार देतात. मायावती विरोधकांना पाठिंबा देत नाहीत. समाजवादी पक्षाने यापूर्वी मायावती यांना मदत केली होती आणि १० खासदारांना दिल्लीत पाठवले होते. पण मायावती यांनी नेहमीच फक्त स्वतःच्या फायद्याचे राजकारण केले. त्या दलितांच्या नेत्या नाहीत हे आता जनतेला समजले आहे, या शब्दांत जुही सिंह यांनी मायावती यांच्यावर टीका केली.
दरम्यान, भाजप नेते आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री मोहसिन रझा म्हणाले की, मायावतींनी मोठ्या मनाने NDA मध्ये सहभागी व्हावे. भाजपने याआधीही मायावती यांचा सन्मान करत मुख्यमंत्री केले होते. समाजवादी पक्षाचे नेते अपमान करत असताना भाजपने मायावती यांना पाठिंबा दिला. सपाने नेहमीच मायावती यांचा तिरस्कार केला. राजकीयदृष्ट्या नुकसान केले. मोदी सरकार सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे. दलित आणि मागासवर्गीयांचा विकास झाला आहे. मायावती यांना एनडीएमध्ये मान मिळेल आणि त्यांच्या येण्याने दलितांच्या विकासाचा लढा अधिक बळकट होईल, असा दावा रझा यांनी केला.