उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे भाजपाचे नेते प्रमोद यादव यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोरांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या प्रमोद यादव यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारांदरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.
भाजपाने २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत मल्हनी विधानसभा मतदारसंघातू प्रमोद यादव यांना उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे पशुपतीनाथ यादव विजयी झाले होते. तर धनंजय सिंह याची पत्नी जागृती सिंह ही दुसऱ्या स्थानी राहिली होती.
हत्याकांडाबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार ही घटना जौनपूरमधील बक्सा ठाणे क्षेत्रातील बोधापूर येथे घडली. तिथे अज्ञात हल्लेखोरांनी भाजपा नेते प्रमोद यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारांदरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
प्रमोद यादव यांच्या हत्ये प्रकरणी आतापर्यंत कुणाविरोधातही आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत. पोलीस हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी तपास करत आहेत. त्यासाठी सीसीटीव्ही चित्रिकरणाची तपासणी केली जात आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींचा शोधही घेतला जात आहे.