उत्तर प्रदेशमधील कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे ह्या सातत्याने चर्चेत असतात. याचदरम्यान, रविवारी शहरातील लोकांना एक वेगळंच चित्र दिसलं. शहरातील कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी महापौर प्रमिला पांडे ह्या आल्या होत्या. त्यानंतर तिथे असं काही घडलं ज्यामुळे लोकांना कौतुकाने टाळ्या वाजवाव्या लागल्या.
त्याचं घडलं असं की, इथे मुली खूप उत्साहाने कबड्डी खेळत होत्या. त्यांना पाहून महापौर प्रमिला पांडे याही कबड्डी खेळण्यासाठी मैदानात उतरल्या. त्यानंतर राजकीय मैदानात डावपेचा आखण्यात वाकबगार असलेल्या प्रमिला पांडे यांनी प्रत्यक्ष कबड्डीच्या मैदानात जे कौशल्य दाखवले, ते पाहून पाहणारे लोक अवाक् झाले.
या कबड्डी स्पर्धेचं आयोजन किडवईनगर येथील रतनलाल क्रीडा मैदानामध्ये भारतीय जनता किसान मोर्चाद्वारे करण्यात आलं होतं. या स्पर्धेला नमो कबड्डी स्पर्धा असं नावं दिलं होतं. तसेच स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर उपस्थित होत्या. तरुण-तरुणींना कबड्डीशी जोडून घेण्यासाठी भाजपाकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे.
कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे ह्या चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दबंग नेत्या म्हणून त्यांची कानपूरमध्ये ओळख आहे. तसेच लोक त्यांना रिवॉल्व्हर दीदी, रिवॉल्व्हर अम्मा या नावांनी त्यांना ओळखतात. त्या जेव्हा नगरसेविका होत्या तेव्हा रिवॉल्व्हर घेऊन जीपमधून फिरायच्या.