भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह हे मागील काही काळापासून एका वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत आहेत. याचा परिणाम असा की, सत्ताधारी भाजपने त्यांना लोकसभेचे तिकीट न देता त्यांच्या मुलाला मैदानात उतरवले. उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथील विद्यमान खासदार ब्रिजभूषण यांनी आता त्यांनी केलेल्या गोळीबाराबद्दल गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीने माझ्या मित्राला मारले होते, त्या व्यक्तीची मी हत्या केली. सगळेजण असे बोलत आहेत की, भाजपने माझ्याकडे दुर्लक्ष केले. पण मी असे मानत नाही कारण पक्षाने माझ्या मुलाला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्ष आमच्यासोबत ताकदीने उभा आहे.
देशांतील नामांकित महिला पैलवानांनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. अशातच कैसरगंज येथून ब्रिजभूषण यांचा मुलगा करण भूषण यांना पक्षाने लोकसभेचे तिकीट दिले आहे. खरे तर ब्रिजभूषण हे सहावेळा खासदार राहिले आहेत. ते एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
ब्रिजभूषण यांचा खुलासामहिला पैलवानांच्या आरोपांवर ब्रिजभूषण म्हणाले की, आम्ही या प्रकरणात निर्दोष सिद्ध होऊ. सगळे आरोप चुकीचे आहेत. काहीच झाले नाही, सर्वकाही खोटे नाट्य सुरू आहे. लवकरच सत्य समोर येईल. एका जरी प्रकरणात मी दोषी आढळलो तर स्वत: फासावर लटकेन. मी आधी बोलल्याप्रमाणे आजही त्या विधानावर ठाम आहे.
गोळीबाराच्या घटनेवर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितले की, तेव्हा क्रॉस फायरिंग झाली होती. आमच्या मित्राची हत्या करण्यात आली होती मग हल्लेखोराला ठार करण्यात आले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. मी केवळ माझ्या बचावासाठी गोळी चालवली होती. ४० मिनिटे गोळीबाराचा थरार सुरू होता. तेव्हा मी खासदार नव्हतो. मी एखादी घटना घडलीच नाही असे म्हणणार नाही आणि मी साधा माणूस आहे असेही म्हणणार नाही. जर आमच्या मित्राची हत्या झाली असेल तर शांत बसून कसे चालेल. त्यांना प्रत्युत्तर देणे गरजेचे होते अन्यथा त्यांनी इतरांवर देखील हल्ला केला असता.