लखनौ - उत्तर प्रदेश भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार रामपती राम त्रिपाठी आणि संतराज यादव यांना न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे सन १९९४ साली घडलेल्या घटनेत ही सजा सुनावण्यात आली आहे. जेव्हा, भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रथयात्रा गोरखपूर येथे पोहोचली होती. यावेळी, पोलिसांना झालेल्या मारहाणीत खासदार रामपती यांच्याकडून एका पोलीस अधिकाऱ्याला कानशिलात लगावण्यात आली होती.
सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि पोलीस अधिकाऱ्याला थप्पड मारण्याच्या आरोपांतर्गत देवरियाचे भाजपा खासदार रामपती राम त्रिपाठी यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावताना रामपती यांच्यासह त्यांचे तत्कालीन सहकारी नारहपूरचे संतराज यादव यांनाही दोषी ठरवले आहे. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर मुख्य न्यायाधीशांनी आरोपींना २३०० रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
फिर्यादी म्हणजेच सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अंबरीष चंद्र मल्ल यांनी सांगितले की, तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक शिवराम सिंह हे आपल्या सहकारी पोलिसांसमवेत १६ जुलै १९९४ रोजी भाजपच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. अडवाणी यांची रथयात्रा नौसड येथून गोरखपूरच्या दिशेने जात असताना मरवडिया कुआ येथे भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला होता. त्यावेळी, पोलीस उपनिरीक्षक शिवमंगल सिंह यांनी आपल्या साथीदारांसह आंदोलक कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी त्यास विरोध करत पोलीस अधिकारी शिवमंगल सिंह यांनाच मारहाण केली होती.
दरम्यान, आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण होत असल्याने इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्ये येऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही जमावाने मारहाण केली. लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत, विटा, दगड आणि कोल्ड्रींक्सच्या बाटल्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या परिस्थितीमुळे समाजात दहशत निर्माण झाली. तसेच, दुकानदारांनी आपली दुकाने बंदही केली होती. याप्रकरणी, आज न्यायालयाने साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे आरोपींना शिक्षा सुनावली.