आग्रा : उत्तर प्रदेशातील इटावा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार डॉ. रामशंकर कठेरिया यांना १२ वर्षे जुन्या प्रकरणात आग्रा जिल्ह्यातील खासदार/आमदार न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना २ वर्षे कारावासाची शिक्षा तसेच ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे ते अपात्र ठरून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे.
डॉ. रामशंकर कठेरिया यांनी २०११ साली आग्रा येथील टोरेंट पॉवर लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयात जाऊन तिथे तोडफोड केल्याप्रकरणी १६ नोव्हेंबर २०११ रोजी पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. या कंपनीच्या व्यवस्थापकाने त्यावेळी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, डॉ. कठेरिया व त्यांच्या सोबत असलेले १५ कार्यकर्ते टोरेंट पॉवर लिमिटेडच्या कार्यालयात शिरले. व्यवस्थापकाला मारहाण व कार्यालयाची नासधूस केल्याचाही आरोप आहे.
राहुल गांधींची खासदारकी त्याच तत्परतेने परत करा मानहानीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर काँग्रेस आता राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यापासून काँग्रेस नेते या कामात व्यग्र आहेत.
राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व ज्या त्वरेने रद्द करण्यात आले होते, त्याच त्वरेने बहाल करण्यात यावे, अशी काँग्रेसची मागणी आहे. शनिवारी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी या प्रकरणी लोकसभा अध्यक्षांकडे आवश्यक कागदपत्रे पाठवून राहुल यांचे सदस्यत्व लवकरात लवकर बहाल करावे, अशी मागणी केली. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.