"दोन्ही 'शहजाद्यां'ना आजपर्यंत चावी सापडेना...", PM मोदींनी थेट सुनावलं; एक राहुल गांधी, दुसरं कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 04:44 PM2024-04-22T16:44:45+5:302024-04-22T16:45:54+5:30
विकसित भारताची चावी देखील आपल्याकडेच आहे. आता देशाला गरिबी, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणापासून पूर्णपणे मुक्त करायची वेळ आली आहे. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
मी गेल्या वेळी जेव्हा अलिगडमध्ये आलो होतो, तेव्हा सपा आणि काँग्रेसच्या घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या कारखान्याला टाळे ठोका, अशी विनंती आपल्या सर्वांकडे केली होती. आपण एवढे मजबूत टाळे ठोकले की, दोन्ही राजकुमारांना (शहजादा) आजपर्यंत याची चावी सापडेना. विकसित भारताची चावी देखील आपल्याकडेच आहे. आता देशाला गरिबी, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणापासून पूर्णपणे मुक्त करायची वेळ आली आहे. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना निशाण्यावर घेतले.
पीक कापणीची वेळ आहे पण... -
मोदी म्हणाले, यावेळी पीक कापणीची वेळ आहे. लग्न समारंभांची वेळ आहे. मात्र देशापेक्षा मोठे काहीच नसते. आपण सर्व कामे बाजूला सारून मतदान करायला हवे. सकाळी-सकाळीच मतदान करणे आवश्यक आहे. उन पडण्यापूर्वी मतदान व्हायला हवे. अल्पोपाहारापूर्वी मतदान व्हायला हवे. आपले प्रत्येक मत महत्वाचे आहे.
पूर्वी शहरांमध्ये बॉम्बस्फोट होत होते -
मोदी म्हणाले, पूर्वी सीमेवर रोज गोळीबार व्हायचा. प्रत्येक मोठ्या शहरात बॉम्बस्फोट होत होते. मात्र आता, बॉम्बस्फोटांच्या मालिकेलाही पूर्णविराम लागला आहे. जे पहिल्यांदाच मतदनाद करणार आहेत, त्यांना हे आठवणार नाही. केवळ लक्षात असू द्या, काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांमधून आणि टीव्हीवर एक जाहिरात येत होती की, कुठेही बेवारस वस्तू आढळल्यास तिच्यापासून दूर राहा. तिला स्पर्श करू नका. कुठे पिशवी, कुकर अथवा टिफिन दिसल्यास त्याच्या जवळ जाऊ नका. तत्काळ पोलिसांना कळवा. अशा घोषणा रोज होत होत्या. फर्स्ट टाइम व्होटर्स तेव्हा छोटे होते. तेव्हा बेवारस गोष्टींमध्ये बॉम्ब ठेवले जात होते. मात्र आता सर्व काही थांबले आहे. हा मोदी-योगींचा चमत्कार आहे. जेव्हा शांती असते तेव्हा विकास होतो.
दंगे योगीजींनी बंद केले -
मोदी म्हणाले, "दंगली, हत्या, गँगवॉर, खंडणी हे सर्व सपा सरकारचा ट्रेडमार्क होता. हीच त्यांची ओळख होती आणि त्यावरच राजकारण चालत होते. मात्र, योगीजींच्या सरकारमध्ये, नागरिकांची शांतत बिघडवण्याची गुन्हेगारांची हिंमत नाही. एवढेच नाही, तर काँग्रेस आणि सपासारख्या पक्षांनी नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण केले. मुस्लिमांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी काही केले नाही. मी जेव्हा पसमंदा मुस्लिमांच्या दुरवस्थेसंदर्भात बोलतो, तेव्हा त्यांना टेन्शन येते. कारण वरच्या लोकांनी मलई खाल्ली आणि पसमांदा मुस्लिमांना त्यांच्या परिस्थितीवर जगण्यास भाग पाडले, असेही मोदी म्हणाले.