यूपीच्या जालौनमध्ये भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. रस्त्याच्या मधोमध त्यांच्यात राडा झाला. महिलांनी एकमेकींचे केस खेचले आणि धक्काबुक्की केली. यावेळी रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी झाली असा दावा समाजवादी पक्षाने एक व्हिडीओ शेअर करताना केला आहे. या महिला भाजपाच्या नारी शक्ती वंदन संमेलनात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या, असं सांगण्यात आलं. पण नंतर काही मुद्द्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या प्रकरणी समाजवादी पक्षाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, एकमेकींचे केस ओढण्याची स्पर्धा, जालौनमध्ये भाजपाच्या संमेलनात आलेल्या महिला कार्यकर्त्या एकमेकींना भिडल्या, पुढे हा वाद टोकाला गेला आणि मारामारी झाली. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आधी आपल्या नेत्यांना शिस्तबद्ध राहायला शिकवले पाहिजे असं समाजवादी पक्षाने म्हटलं आहे.
जालौनच्या कालपी नगर येथील राम वाटिका गेस्ट हाऊसमध्ये भाजपाचा नारी शक्ती वंदन संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय राज्यमंत्री भानु प्रताप वर्मा आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्री अर्चना पांडे यांच्यासह अनेक नेते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. मात्र काही महिला आपापसात भांडू लागल्या. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिलांचे दोन गट आपापसात भांडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
एका महिलेने दुसऱ्या महिलेचे केस पकडले आहेत. ती तिला जोरात खेचत आहे. यामुळे महिला जमिनीवर पडली. इतर महिला त्यानंतर तिच्या बचावासाठी येतात. तिचे केस ओढणाऱ्या महिलेला धक्काबुक्की करू लागतात. दोन्ही बाजूंनी जोरदार हाणामारी होत आहे. रस्त्यावर वाहतूककोंडी आहे. व्हिडिओमध्ये ओरडण्याचा आणि वाहनांच्या हॉर्नचा आवाज ऐकू येतो. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे.