राजेंद्र कुमार
लखनौ : उत्तर प्रदेशच्या राजकारणात उलटसुलट राजकीय हल्ले-प्रतिहल्ले होत आहेत. त्यातच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही भाजप नेत्यांविरुद्ध उडी घेतली आहे. त्यांनी आपल्या खास शैलीत सोशल मीडियावर ‘१०० आणा आणि सरकार बनवा,’ अशी सूचक ‘मान्सून ऑफर’ दिली आहे.
सरकार स्थापनेचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर १०० आमदार फोडून आणा, समाजवादी पक्ष पाठिंबा देईल, अशी ऑफर अखिलेश यांनी काही दिवसांपूर्वीही दिली होती. त्यांची ही ऑफर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासाठी होती असे सांगण्यात येते. आता पुन्हा अखिलेश यांनी ही ऑफर दिली आहे. त्यावर भाजपच्या बड्या नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, ‘अखिलेश यांनी संघर्ष करून पक्ष स्थापन केला असता, तर आज त्यांना अशा ऑफर देण्याची गरज पडली नसती, असे भाजप प्रवक्ते आलोक अवस्थी म्हणाले.
असे आहे गणित...
सध्या यूपीमध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपमधील वाद अधिकच गडद होत चालला आहे. अशा वातावरणात योगी सरकारमधील उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सरकारपेक्षा संघटना मोठी असल्याचे सांगून राज्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे अखिलेश यांच्यासह इतर विरोधी पक्षांनीही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच अखिलेश यांची ही ताजी ऑफर आल्याचे मानण्यात येते.
भाजपमधील कलह वाढविण्यासाठी...
मौर्य यांनी १०० भाजप आमदारांसह वेगळा गट स्थापन करून ते अखिलेश यांच्याबरोबर गेले तर सरकार स्थापन करू शकतात.
अखिलेश यांनाही हे माहीत आहे, तरीही ते भाजपमधील कलह आणखी तीव्र करण्यासाठी ऑफर देत आहेत. दुसरीकडे मौर्य अखिलेश यांच्या ऑफरकडे दुर्लक्ष करून पक्षाप्रती आपली बांधिलकी दाखवत आहेत.