बरेली - उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील शाहजहाँपूर रोडवर अवैध पद्धतीने उभारण्यात आलेल्या कॉलनीवर प्रशासनाने बुलडोझर फिरवला. सोमवारी बीडीएच्या अतिक्रमण कारवाई पथकाने कॉलनीतील जवळपास ५० घरांवर बुलडोझर फिरवत ते बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईमुळे अवैध बांधकाम करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
बीडीएस म्हणजे बरेली विकास प्राधिकरण (बीडीएस) च्या कारवाई पथकाने अवैध बांधकामांवर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. शाहजहाँपूर रोडवरील मोहनपूर ठिरीया गावानजिक १०० बिघा जमीन म्हणजे अंदाजे ७० ते ७५ एकर जमिनीवर बांधण्यात आलेल्या कॉलनीतील ५० घरांचे बांधकाम पाडण्यात आले. कृष्णा सिटी कॉलनी नावाने येथे वसाहत उभारण्यात आली होती.
बीडीएचे उपाध्यक्ष जोगिंदर सिंह यांनी सांगितले की, धनराज बिल्र्डर्सच्या राकेश शर्मा यांनी कृष्णा कॉलनी विकसीत केली होती. त्यामुळे, सोमवारी संबंधित विभागाने कारवाईची मोहिम हाती घेत अवैधपणे उभारण्यात आलेल्या या वसाहतींवर कारवाई केली. या जागेवर ५० घरे आणि ५ दुकाने उभारण्यात आली होती. कॉलनीचे गेट बसवण्यात आले होते, वीजेचे खांबही टाकण्यात आले होते. सुदैवाने येथे कोणीही राहत नव्हते.
शहर आणि आजुबाजूच्या परिसरात प्लॉट किंवा जमीन खरेदी करताना कागदपत्रांची पूर्तता आणि खात्री करुनच व्यवहार करावा. बीडीए कार्यालयातून या जागेच्या कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहावी, त्यानंतरच प्लॉट खरेदी करावा, असे आवाहन बीडीए उपाध्यक्ष जोगिंदर सिंह यांनी केले आहे.