उत्तर प्रदेशमध्ये एक बस कंडक्टर प्रवाशांकडून मिळालेले तिकिटाचे पै आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावण्यासाठी वापरत असल्याची बाब उघडकीस आली आहे. परिवहन विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर याबाबत चौकशी सुरू झाली. चौकशी सुरू होताच या कंडक्टरने गुपचूप सगळे पैसे परिवहन विभागाच्या खात्यात जमा केले. मात्र या प्रकाराची आता विभागीय चौकशी सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लखनौमधील कैसरबाह डेपोमध्ये पंकज तिवारी हा कंडक्टर म्हणून काम करतो. तो परिवहनच्या बससोबत दिल्लीला गेला होता. तिथून देहराडून येथे जाऊन ८ एप्रिल रोजी लखनौला परतला होता. यादरम्यान, त्याला लांब पल्ल्याच्या प्रवाशांच्या तिकिटाचे सुमारे ६५ हजार रुपये रोख मिळाले. हे पैसे त्याने ९-१० एप्रिलदरम्यान डेपोमध्ये जमा करणं आवश्यक होतं. मात्र कंडक्टरने असं केलं नाही. तो पैसे घेऊन १० दिवस गायब झाला.
दरम्यान, त्याने हे पैसे आयपीएल सामन्यांवर सट्टा लावण्यासाठी वापरल्याची माहिती समोर आली. तसेच प्राथमिक तपासामध्ये या प्रकरणात कैसरबाग बस स्थानकाचे प्रभारी एस.के. गुप्ता यांचाही सहभाग असल्याचे समोर आले. रोख रक्कम बँकेत जमा करण्याची जबाबदारी ही एस. के. गुप्ता यांची होती. मात्र त्यांनी अनेक दिवस हे प्रकरण दाबून ठेवले. जेव्हा ही बाब उघडकीस आली. तेव्हा त्यांनी ही रक्कप गुपचूप जमा केली.
पंकज तिवारी हा कंडक्टर रोख रक्कम बऱ्याचदा जमा करत नाही, तसेच फार उशिराने जमा करतो, असा आरोप आहे. आता या प्रकरणात संबंधिक कंडक्टरकडून खुलासा मागवण्यात आला आहे. तसेच सध्या त्याला ड्युटीवरून हटवण्यात आलं असून, त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. कैसरबाग डेपोचे एसआरएम अरविंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी कंडक्टरची चौकशी करण्यात आली आहे. सध्या ह्या कंडक्टरला ड्युटीवरून हटवण्यात आलं असून, या प्रकरणात ज्यांचा सहभाग आढळेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.