अयोध्या : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमदार आणि मंत्र्यांसह रामललाचे दर्शन घेतले. सर्व आमदार आणि मंत्री सकाळी ९ वाजता लखनौहून अयोध्येला रवाना झाले. अयोध्येत पोहोचल्यावर त्यांचे फुलांनी स्वागत करण्यात आले. यानंतर सर्वांनी मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेतले. विधानसभा अध्यक्ष सतीश महाना आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य बसने अयोध्येला पोहोचले होते. त्यांच्याशिवाय अर्थमंत्री सुरेश खन्ना आणि कुंडाचे आमदार राजा भैया बसमधील पुढच्या सीटवर बसून जय श्री रामच्या घोषणा देत होते.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हेलिकॉप्टरने अयोध्येत पोहोचले. त्यानंतर त्यांनी आमदारांसह रामललाचे दर्शन घेतले होते. मात्र भाविकांची संख्या लक्षात घेता आमदारांनी हनुमानगढीला दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन रद्द केला. ज्या बसमध्ये आमदार आणि मंत्री आले, त्या बसमध्ये रामधुन वाजवली जात होती. बसमध्ये सर्व प्रकारची फुले लावली होती. खाण्यापिण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. याशिवाय, मंत्री आणि आमदारांना आठवणीसाठी एक बॅग देण्यात आली, ज्यामध्ये एक डायरी, एक कॅलेंडर आणि एक पेन होते.
यावेळी अयोध्येला भेट देण्यासाठी आलेले उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री नंद गोपाल नंदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "विरोधी पक्षात असे लोक आहेत, जे तुष्टीकरणाचे राजकारण करतात, मग ते काँग्रेस असो किंवा समाजवादी पक्ष. त्यांच्या पूर्वजांना समाजवादी पक्षाचा वारसा मिळाला आणि त्यांनी सनातन धर्माला विरोध केला." याशिवाय, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, "आज सर्व आमदारांना अयोध्येत प्रभू राम यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली…त्यांना आशीर्वाद मिळू दे आणि २०४७ पर्यंत आपला विकसित भारत होऊ दे."