लखनऊ : उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात सणासुदीला सुरुवात झाली आहे. सणासुदीचा हंगाम सुरू होताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी (Safety of Women) अनेक पावले उचलली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सेफ सिटी प्रोजेक्ट अंतर्गत महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी अनेक निर्णय घेतले जात आहेत. याअंतर्गत संपूर्ण राज्यात 3000 पिंक बूथ आणि सर्व 10417 महिला बीट्सना पिंक स्कूटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नुकतेच या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 9 शहरांतील 20 धार्मिक स्थळांवर पिंक बूथ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, तर 17 महापालिकांमधील आणि गौतमबुद्धनगरमधील 1100 महिला बीट कॉन्स्टेबलना इलेक्ट्रिक स्कूटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यात पिंक बूथ बांधण्यासाठी आणि इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्कूटरसाठी तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. आता महिला व बाल संरक्षण संघटनेने प्रस्ताव तयार करून शासनाला उपलब्ध करून दिला असून, तो मंजूर होताच त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सुरू केले जाणार आहे.
राज्यातील सेफ सिटी प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 17 महापालिकांसह गौतम बुद्धनगरचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, दुसऱ्या टप्प्यात 57 जिल्हा मुख्यालयी नगरपालिका आणि तिसऱ्या टप्प्यात 143 नगरपालिका सेफ सिटी प्रकल्पाशी जोडल्या जाणार आहेत. महिला व बाल संरक्षण संघटनेचे एडीजी बीपी जोगदंड यांनी सांगितले की, सेफ सिटी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील नऊ शहरांमध्ये 20 धार्मिक स्थळांवर पिंक बूध बांधण्यात येणार आहेत. यामध्ये वाराणसी, अयोध्या, प्रयागराज, मिर्झापूर, मथुरा, गोरखपूर, आग्रा, बलरामपूर आणि चित्रकूटचा समावेश आहे. सर्वत्र सिंगल स्टोरी पिंक बूथ बांधले जातील. त्यासाठी 1.66 कोटी रुपयांचा प्रस्ताव विभागाने गृह विभागाकडे पाठवला आहे.
यासोबतच पिंक बूथसाठी जागा ओळखण्यासाठी आणि माहिती शेअर करण्यासाठी सर्व 9 जिल्ह्यांतील पोलिस अधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यात आले होते, त्यापैकी अनेक जिल्ह्यांतून अहवाल आले आहेत. गृह विभागाकडून अंदाजपत्रक जारी होताच बूथच्या बांधकामाला सुरुवात केली जाईल, असे एडीजींनी सांगितले. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका आणि गौतमबुद्ध नगरमध्ये 501 पिंक बूथ बांधण्यात येणार आहेत, तर तिसऱ्या टप्प्यात राज्यातील उर्वरित शहरांमध्ये 2480 पिंक बूथ बांधण्यात येणार आहेत.
याचप्रमाणे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विभागीय मुख्यालय आणि गौतम बुद्धनगर येथील 550 पोलिस ठाण्यांना दोन जीपीएस असलेल्या पिंक स्कूटर सुपूर्द केल्या जातील, ज्याचा वापर 1100 महिला बीट कॉन्स्टेबल करणार आहेत. त्यासाठी 15.60 कोटी रुपयांचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आला आहे. सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळताच 550 पोलिस ठाण्यांना पिंक स्कूटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या दोन्ही प्रस्तावांना सरकारकडून या महिन्यात ग्रीन सिग्नल मिळू शकतो. त्याचबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी विभागाकडून आराखडा तयार करण्यात येत आहे.