अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघी अयोध्या नगरी सजली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील सर्व शाळा व कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. २२ जानेवारी रोजी राज्यातील वाईन शॉपही बंद राहणार आहेत. अवघ्या राज्यभरात राम मंदिर सोहळ्याचा उत्सव असून देशभरातून भाविक अयोध्येला येत आहेत. अयोध्येत २२ जानेवारी रोजी १७ लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. तर, २२ जानेवारीनंतरही अयोध्येत दर्शनासाठी येण्याचं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम भक्तांना केलं आहे. विशेष म्हणजे हे दर्शन आमदार-खासदारांकडून होईल, असेही ते म्हणाले.
राम मंदिर सोहळा हा भाजपाने आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय बनवला आहे. त्यामुळे, सर्वच देशवासीयांना या सोहळ्यात सहभागी करुन घेतलं जात आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही अयोध्येचं दर्शन घडवणार असल्याचं सांगत मतदारांना भाजपाने आवाहन केलं होतं. आता, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर भाषणातून देशभरातील भाविकांना अयोध्येत दर्शनासाठी येण्याचं आवाहन केलं आहे. २२ जानेवारीनंतर भक्तांनी नियोजन करुन अयोध्येत यावे. त्यासाठी, आमदार-खासदार खर्च करतील, असेही योगींनी म्हटलं.
एक काळ असा होता की, अयोध्येचा नाव घेताच अनेकांना करंट लागायचा. अयोध्या हे नावही घ्यायला भीती वाटायची, पण आता जगभरातून भाविकांना अयोध्येला येऊ वाटत आहे. अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन करू वाटत आहे. नवीन उत्तर प्रदेशात त्रेतायुगीन बदल दिसून येत आहे. एअर कनेक्टीव्हीटीही वाढविण्यात आली आहे. त्यामुळे, दूरदूरुन भाविकांना सहजपणे अयोध्येची यात्रा करता येईल. उत्तर प्रदेशात सर्वत्र विकास होत असून आता कर्फ्यू कुठेही लागला जात नाही. कर्फ्यूऐवजी कावड यात्रांचे आयोजन केले जात आहे.
काय आहे भाजपाचं मिशन 'अयोध्या दर्शन'
भाजपच्या काही आमदारांना अयोध्येत लोकांना नेण्यासाठी टार्गेट देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या या नव्या कल्पनेमुळे देशभरातील विविध मतदारसंघातील लाखो नागरिकांना विधानसभा निवडणुकीपर्यंत अयोध्येला नेणं शक्य होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर राज्यातील भाजप आमदारांनी पुढील काही महिन्यात त्यांच्या मतदारसंघातून किमान ५ हजार नागरिकांना अयोध्येला नेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यासाठी आवश्यक याद्या तयार करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात रेल्वे बुकींग करुन 'राम दर्शन विशेष ट्रेन' नावाने भाजपा नेत्यांकडून हे अयोध्या दर्शन मतदारसंघातील भाविकांना घडवले जाईल.