Ayodhya Ram Mandir: अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराचे उद्घाटन जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात केले जाणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख पंतप्रधान निवडतील, जेणेकरून उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांची उपस्थिती सुनिश्चित करता येईल. यासोबतच सर्व संप्रदायातील संत-मुनींनी उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीला जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत योगी आदित्यनाथ पंतप्रधान मोदी यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण देतील, असे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, योगी आदित्यनाथ पंतप्रधान मोदी यांना भेटून राम मंदिराच्या उद्घाटनाच्या काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करतील. राम मंदिर लोकार्पणाशी निगडीत तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे. १५ जानेवारी ते २४ जानेवारी या दरम्यान राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केले जाऊ शकते. लवकरच याची तारीख निश्चित केली जाऊ शकते. तसेच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारीही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
राम मंदिर लोकार्पणासंदर्भात योगी आणि मोदी भेट
मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. काही दाव्यांनुसार, २०२४ पूर्वी राम मंदिराचे लोकार्पण केले जाऊ शकते. दुसरीकडे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराचे लोकार्पण तसेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी अनेक प्रकारची अनुष्ठाने सुरू आहेत. वेदमंत्रोच्चारात यज्ञ-याग करून आहुत्यांचा स्वाहाकार केला जात आहे. रामायण तसेच श्रीमद् भागवताचे पठण सुरू आहे. याशिवाय काशी आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी अनुष्ठान सुरू आहे. महाराष्ट्रात दर १५ दिवसांच्या अंतराने अनुष्ठाने सुरू आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय लाखो भाविक राम मंदिर लोकार्पणावेळी उपस्थित राहू शकतील, असा अंदाज आहे. या सर्वांची सोय, पार्किंग व्यवस्था, स्वच्छता यावर आतापासूनच भर दिला जात आहे. मंदिर खुले झाल्यानंतरही रामभक्तांना रामाच्या मूर्तीला हात लावण्याची संधी मिळणार नाही. भाविकांना गर्भगृहात प्रवेश दिला जाणार नाही. सुमारे ३५ फूट अंतरावरून लोकांना दर्शन घेता होईल. गर्भगृहाचे पावित्र्य राखण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याचा अधिकार फक्त राजा आणि मंदिराच्या पुजाऱ्याला आहे. ही पारंपरिक पद्धत लक्षात घेऊन केवळ पंतप्रधान आणि पुजारी यांनाच गर्भगृहात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.