Congress Alleges Several Vehicles Outside Its Amethi Office Vandalised : अमेठी : उत्तर प्रदेशमधील अमेठीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील गौरीगंजमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. तसेच, सीओसह स्थानिक पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या घटनेवरून काँग्रेसने भाजपावर आरोप केला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने आपल्या एक्स हँडलवर लिहिले की, "पराभवाच्या भीतीने भाजपा घाबरली आहे. अमेठीमध्ये प्रशासनाच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या डझनभर वाहनांची तोडफोड केली. जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तेथून हल्लेखोरांचा पाठलाग केला. मात्र पोलीस प्रत्येक वेळी प्रेक्षकच राहिले जणू काही त्यांच्याच इशाऱ्यावर घडत आहे."
याचबरोबर, उत्तर प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे की, "भाजपने आपला पराभव आधीच मान्य केला आहे, म्हणूनच त्यांनी अशा नीच आणि क्षुल्लक कृत्यांचा अवलंब केला आहे. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी कोणालाच घाबरत नाहीत." दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अमेठीमध्ये काँग्रेसने किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. किशोरी लाल शर्मा यांच्याविरोधात भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या स्मृती इराणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर बसपाने या ठिकाणी नन्हे सिंह चौहान यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, येथे मुख्य लढत भाजपा आणि काँग्रेस यांच्यातच असल्याचे दिसून येत आहे.
सध्या या जागेवरून स्मृती इराणी खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी या जागेवरून तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला होता. एकीकडे काँग्रेस आपला गमावलेला सन्मान परत मिळवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे भाजपा पुन्हा एकदा या जागेवर विजयावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करत आहे.