राजेंद्र कुमार -
जौनपूर : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी मंगळवारी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षावर (भाजप) हल्लाबोल करत त्यांना दलितविरोधी ठरवले. दोन्ही पक्षांचे हेतू आणि विचार आरक्षणाच्या विरोधात असून, हे पक्ष बड्या उद्योगपतींचे पक्ष असल्याचा आरोप केला.
मायावती म्हणाल्या की, या पक्षांनी उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली आणि देणग्या घेतल्या. भाजपच्या राजवटीत दलित, आदिवासी किंवा इतर कोणत्याही वर्गाची प्रगती झालेली नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचा फटका देशाला बसत असून, वाढती महागाई, गरिबी, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारामुळे जनता हैराण झाली आहे, असे मायावती म्हणाल्या. जर मुक्त वातावरण निवडणूक झाली तर भाजप सत्तेत येणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
मतांसाठी आरक्षणाच्या मोठमोठ्या गप्पा मारत आहेत -आमच्या सरकारने आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या दिल्या. रिक्त सरकारी पदे भरली गेली आणि आता मात्र संपूर्ण देशातील सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा कोटा शिल्लक आहे. सर्वच पक्ष मतांसाठी आरक्षणाच्या मोठमोठ्या गप्पा मारत आहेत. अच्छे दिनच्या नावाखाली आमिष दाखवले जात असल्याचे आता लोकांना समजले आहे.
भाजप गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या मित्रपक्षांसोबत सत्तेत आहे. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक असून यावेळी भाजपला सहजासहजी सत्ता मिळणार नाही. यावेळी भाजप नेत्यांची भाषणबाजी आणि नाटके चालणार नाहीत. जनतेला सर्व काही समजले आहे. भाजपने अच्छे दिन दाखविण्याचे आश्वासन दिले होते. मात्रश सर्व काही स्वप्नातच राहिले, अशी टीका त्यांनी केली.