उत्तर प्रदेशात काँग्रेसची मोठी खेळी, मोदींना आव्हान देणाऱ्या नेत्याकडे सोपवलं नेतृत्व, समिकरणे बदलणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 11:03 PM2023-08-17T23:03:22+5:302023-08-17T23:03:43+5:30
Congress: खासदारांच्या संख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचं अस्तित्व नाममात्र उरलं आहे. दरम्यान, येथे भाजपाला आव्हान देण्यासाठी काँग्रेसने आपल्या पक्षसंघटनेमध्ये मोठे फेरबदल केले आहेत.
खासदारांच्या संख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्येकाँग्रेसचं अस्तित्व नाममात्र उरलं आहे. दरम्यान, येथे भाजपाला आव्हान देण्यासाठी काँग्रेसने आपल्या पक्षसंघटनेमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींना दोन वेळा आव्हान देणारे आणि पाच वेळा आमदार राहिलेले अजय राय यांची उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याबरोबरच मध्य प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीसपदाची जबाबदारी रणदीप सुरजेवाला यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर मुकुल वासनिक यांना गुजरातचे प्रभारी सरचिटणीस बनवण्यात आले आहे.
अजय राय हे उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी भाजपामधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र आता ते काँग्रेसचे आघाडीचे नेते बनले आहेत. त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते. मात्र दोन्ही वेळा त्यांचा दारुण पराभव झाला होता.
अजय राय हे पाच वेळा आमदार राहिले आहेत. त्यापैकी तीन वेळा त्यांनी भाजपाच्या तिकिटावर विजय मिळवला होता. तर दोन वेळा ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. २००९ मध्ये त्यांना लोकसबेची निवडणूक लढवायची होती. मात्र तिकिट न मिळाल्याने त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी भाजपाचे बडे नेते मुरली मनोहर जोशी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले होते.