Lok Sabha Elections 2024: उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने लोकसभेसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्येकाँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी तुटल्याची चर्चा आहे. जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही. सपाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. सपाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते अनिल यादव यांनी समाजवादी पक्षाला फटकारले आहे.
समाजवादी पार्टी करत असलेले हे कृत्य उत्तर प्रदेशातील दलित, मागासलेले लोक आणि मुस्लिम पाहत आहेत. रोज नवनवीन याद्या जाहीर करून आघाडी धर्माची खिल्ली उडवली जात आहे. एकीकडे समाजवादी पक्षाचे नेते जागांवर सहमती दर्शवतात आणि नंतर यादी जाहीर करतात, असे अनिल यादव यांनी सांगितले.
अनिल यादवांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सपाला फटकारताना कवी दुष्यंत कुमार यांच्या कवितेच्या दोन ओळी शेअर केल्या. ते म्हणाले की, 'तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं, कमाल ये है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं', समाजवादी पार्टीतील मित्रांनो, दुष्यंत कुमार यांची ओळ नीट पाहा, उपयोगी पडेल.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या इंडिया आघाडीत अद्याप जागावाटपाबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. तरीदेखील समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या बहुतांश जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सपाने खासदार अफजल अन्सारी यांना गाझीपूरमधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय मुझफ्फरनगरमधून हरेंद्र मलिक, आमलामधून नीरज मौर्य, शाहजहांपूरमधून राजेश कश्यप, हरदोईमधून उषा वर्मा, मिश्रीखमधून रामपाल राजवंशी, प्रतापगढमधून एसपी सिंह पटेल, बहराईजमधून रमेश गौतम, गोंडामधून श्रेया वर्मा आणि चंदौलीमधून वीरेंद्र सिंग यांना तिकीट दिले आहे. विशेष म्हणजे, सपाने याआधी १६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. समाजवादी पक्षाने ३० जानेवारी रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये १६ उमेदवारांची नावे जाहीर होती. मग १९ फेब्रुवारीला दुसरी आणि २० तारखेला तिसरी यादी जाहीर करण्यात आली.