त्रियुग नारायण तिवारी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या : श्री रामजन्मभूमीच्या तात्पुरत्या मंदिरात भाविकांची दर्शन पूजा २० जानेवारीपासून बंद होणार आहे. मात्र, मंदिरातील पुजारी पूजेचा कार्यक्रम सुरू ठेवणार आहेत. विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम असल्याने २२ जानेवारीला तात्पुरत्या मंदिरातून प्रभू श्रीरामांची बालमूर्ती स्थापित करण्यासाठी २० जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत तात्पुरत्या मंदिरात भक्तांचे दर्शन आणि पूजा बंद राहणार आहे, असे रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ.अनिल मिश्रा यांनी सांगितले. ट्रस्टच्या निमंत्रण पत्रिकेसोबतच २२ जानेवारीला अयोध्येत प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये सर्व भाविकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठेची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे, तसेच प्राणप्रतिष्ठेनंतर येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि इतर सामाजिक संस्था सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत. उत्तर प्रदेेश सरकारने राम मंदिर तयारीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची घोषणा केली आहे.
विरोधी गटाच्या महंतांना बोलावले
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची निमंत्रण पत्रे अयोध्या जिल्ह्यातही वाटली जात आहेत. विश्व हिंदू परिषदेचे अधिकारी आणि संतांनी हनुमानगढीचे महंत ज्ञान दास यांना त्यांच्या मठात पोहोचून निमंत्रण पत्र दिले आहे. महंत ज्ञान दास हे विश्व हिंदू परिषदेच्या विरोधी गटाचे महंत म्हणून ओळखले जातात. ते एके काळी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते.
विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी
अयोध्येतील श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अयोध्या धाम रेल्वेस्टेशन येथील नवीन इमारतीचे उद्घाटन, अनेक वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबर रोजी अयोध्येत येत असून, त्यासाठीची तयारीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
सूर्यस्तंभ, सूर्य मंदिराचे काम वेगाने...
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील धरमपथ, रामपथावर ‘रोड शो’ही करणार आहेत, तसेच ते अयोध्या धाम जंक्शनच्या उद्घाटनासाठी जाणार आहेत. ‘रोड शो’साठी प्रशासनाकडूनही मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. धरमपथावरील सूर्य स्तंभ आणि सूर्यमंदिराचे काम वेगाने पूर्ण होत आहे.