बांदा - उत्तर प्रदेशच्याबांदा जेलमध्ये कैद असलेल्या मुख्तार अंसारी यास ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. उल्टी झाल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत मुख्तार अंसारीला राणी दुर्गावती मेडीकल कॉलेजच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर, तत्काळ ९ डॉक्टरांचे पथक त्याच्यावरील उपचारासाठी तयार करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही मुख्तार अंसारी याचे निधन झाले.
माफिया डॉन मुख्तार अंसारीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेश राज्यात पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. मऊ आणि गाझीपूर येथे पोलिसांचा फ्लॅग मार्च करण्यात आला आहे. मेडिकल कॉलेज आणि बांदा तुरुंगाबाहेरही पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन डॉक्टरांच्या पथकाकडून मुख्तार अंसारीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान, युपीतील गँगस्टर असेलल्या मुख्तारने गुन्हेगारीतून राजकारणात प्रवेश केला. ४० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेला मुख्तार गेल्या १४ वर्षांपासून तुरुंगात होता.
मुख्तार अंसारी तुरुंगात अचानक बेशुद्ध होऊन पडला होता. यापूर्वी मंगळवारीही त्यास राणी दुर्गावतील मेडीकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. स्टुल सिस्टीमचा त्रास होत असल्याने त्याला १४ तास आयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, तुरुंगात मला स्लो पॉईजन दिलं जात असल्याचा आरोप मुख्तारने कोर्टात प्रार्थना पत्र देऊन केला होता. आज मुख्तारचा अकाली मृत्यू झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.