लखनौ - समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी आमदार आझम खान यांनी पोलीस अधिकाऱ्यासोबत वाद घातला. यावेळी, पोलिसांना नोकरीची आठवण करुन देत, आम्ही केलेले उपकार विसरलात का, अशा शब्दात सुनावले. त्यावर, पोलीस अधिकाऱ्यानेही खान यांना जशास तसे उत्तर दिलं. सीटी सिओसोबत खान यांच्या झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावरुन, अनेकांनी आझम खान यांना ट्रोल केलंय. समाजवादी पक्षाच्या कार्यालयात गेल्यानंतर, वाटेतच पोलिसांनी खान यांची कार अडवली होती. त्यावर, त्यांनी संताप व्यक्त केला.
समाजवादी पक्षाच्या डेलिगेशनमध्ये आलेल्या सदस्यांची कार पोलिसांनी अडवली होती. त्यावर, नाराज होऊन आझम खान यांनी सीटी सिओ अनुज चौधरी यांना प्रश्न केला. तुम्ही सिओ सिटी आहात का?. समाजवादी पक्षानेच तुम्हाला ऑर्गेनाइज केलं होतं. आमचे उपकार लक्षात नाहीत का तुम्हाला? असे म्हणत चौधरी यांना सुनावलं. त्यावर, सीओ चौधरी यांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. उपकार कसले, आम्ही पैलवान होतो, अर्जुन अवॉर्ड जिंकला आहे. उपकाराचा विषयच नाही, असे म्हणत पोलीस अधिकाऱ्याने आझम खान यांना प्रत्युत्तर दिलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आझम खान म्हणाले की, आम्ही आमच्या वरिष्ठांच्या उपकाराची जाणीव ठेवतो, तुम्हाला तर मी सुंदर म्हणालो. त्यावर, सिटी सीओ चौधरी म्हणाले की, आमच्यामुळे तुम्हाला काय नाराजी झाली, तुम्ही आमच्यावर का नाराज आहात, आम्ही काय केलंय?. त्यानंतर, खान यांनीही उत्तर देत, तुमचे कारनामे मोबाईलमध्ये आहेत, असे म्हणत ते त्यांचा मुलगा अब्दुल्लासोबत पुढे निघून गेले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आझम खान यांना भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. एमपी-एमएलए कोर्टाने त्यांना दिलासा दिला. भडकाऊ भाषण केल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द झाली होती. तर, तीन वर्षांची सजाही सुनावण्यात आली होती.