Yogi Adityanath : सिधौली : लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. या पक्षांचा डीएनए पाकिस्तानसारखा आहे. तिथले लोक भुकेने मरत आहेत आणि विकासाचा अभाव आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
सिधौली येथील गांधी डिग्री कॉलेजमध्ये आयोजित प्रचार सभेत योगी आदित्यनाथ यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या काळात गरीब भुकेने मरत होते आणि आता पाकिस्तानमध्ये लोक उपाशी मरत आहेत, तर भारतात 80 कोटी लोकांना मोफत रेशन मिळत आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, "काँग्रेसला 60-65 वर्षे भारताच्या विकासासाठी काम करण्याची संधी होती, मात्र त्यांनी तसे केले नाही. यूपीए सरकारच्या काळात वैद्यकीय सुविधांचा अभाव होता. ते लोकांच्या विश्वासाशी खेळत होते. गोरगरिबांना उपासमारीने मरू दिले आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. काँग्रेस, समाजवादी पार्टी , इंडिया आघाडी आणि पाकिस्तान यांचा डीएनए एकच असल्याचे वाटते."
या लोकसभा निवडणुकीत देशाच्या भवितव्याशी खेळण्याचे धाडस करणाऱ्या अशा राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करावे, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी जनतेला केले. तसेच, काँग्रेस-समाजवादी पक्षाकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही. त्यांच्या काळात विकासाचा वेग खूपच कमी होता, कारण त्यांना केवळ कमिशनमध्येच रस होता, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
पुढे योगी आदित्यनाथ म्हणाले की, जे भ्रष्ट आहेत आणि भारताचा विकास होऊ द्यायचा नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पद मिळवत अल्यामुळे नाराज आहेत. तसेच, इंडिया आघाडी भगवान राम, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, मुली आणि व्यापाऱ्यांसह उपेक्षित समुदायांना विरोध करते. त्यामुळे नागरिकांनी स्वत:चा विकास करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचंड बहुमताने पुन्हा निवडून देण्याचा निर्णय घेतला आहे, असे योगी आदित्यनाथ सांगितले.