उपचारांसाठी आपल्यासमोर येणाऱ्या रुग्णाला जीवदान देण्याचं काम करत असल्याने डॉक्टरांना देव असं संबोधलं जातं. काही डॉक्टर मात्र या पवित्र पेशाला कलंक लावण्याचं काम करतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील सैफई वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर समीर सर्राफ याला रुग्णांना बनावट पेसमेकर लावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. परदेश प्रवासासाठी पैसे जमवण्यासाठी या डॉक्टरने जे काही केलं, त्याबाबत ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही.
२५० लोकांचं ऑपरेशन करून त्यांना बनावट पेसमेकर लावल्या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी समीर सर्राफ याला अटक केली आहे. डॉक्टर समीर सर्राफ याने रुग्णांना बनावट पेसमेकर लावण्यासाठी कंपनीशी करार केला होता. त्याबदल्यात डॉक्टर समीर सर्राफ हे रुग्णांना ब्रँडे़ कंपनीच्या नावाखाली बनावट पेसमेकर लावून भरपूर पैसे कमवायचे. एवढंच नाही तर या बदल्यात कंपन्यांनी डॉक्टरांना ८ परदेश दौरेही घडवून आणले होते.
युनिव्हर्सिटीमध्ये मेडिकल उपकरणे खरेदी करण्याच्या नावाखालीही या डॉक्टराने सुमारे अडीच कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. गॅझेटेड अधिकारी आणि पोलिसांनी केलेल्या तपासामद्ये डॉक्टर समीर सर्राफ हे दोषी आढळले. सैफई पोलिसांनी आयपीसीमधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात ही फेब्रुवारी २०२२ मध्ये झाली होती. काही रुग्णांनी पोलिसांकडे जात डॉक्टर समीर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आपल्या हृदयाचं ऑपरेशन करून त्यामध्ये बनावट पेसमेकर लावण्यात आल्याचा आरोप या रुग्णांनी केली होता. तसेच त्यामुळे आपल्याला खूप त्रास सहन करावा लागत आहे, असे या रुग्णांनी तक्रारीमध्ये म्हटले होते.
दरम्यान तपास समितीने तपासामध्ये पाहिले की, एका रुग्णाकडून सर्राफ यांनी पेसमेकर लावण्यासाठई १.८५ हजार रुपये घेतले. ही रक्कम निश्चित रकमेपेक्षआ दुप्पट होती. त्याच काळात डॉक्टर समीर सर्राफ हे लाच घेत असल्याचाही एक सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला होता. प्रकरणाचं गांभीर्य पाहून सैफई पोलिसांनी समीर सर्राफविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.