लखनौ - सरकारी नोकरीसाठी उमेदवार मोठे कष्ट घेऊन तयारी करतात. तर, पोलीस किंवा सैन्य भरतीसाठीही तरुणाई जीवाचं रान करते. शारिरीक तयारीसह लेखी परीक्षेचाही अभ्यास केला जातो. सर्वच राज्यातील तरुण या नोकरींसाठी वर्षानुवर्षे तयारी करत असतात. मात्र, एका तांत्रिक चुकीमुळे किती गोंधळ होऊ शकतो, याचे उदाहरण उत्तर प्रदेशातून समोर आलं आहे. तांत्रिक चुकीमुळे उमेदवाराला पोलीस भरतीची परीक्षा देता आली नाही. धर्मेंद्र कुमार यांनी पोलीस भरतीसाठी गेल्या २ वर्षांपासून घेतलेली मोठी मेहनत वाया गेल्याची व्यथाच त्यांनी पोलिसांसमोर मांडली.
उत्तर प्रदेशातील पोलीस भरती परीक्षेच्या हॉल तिकीटावर चक्क सनी लिओनीचा फोटो छापून आल्याने खळबळ उडाली होती. पॉर्नइंडस्ट्रीला रामराम करत बॉलिवूडची वाट धरणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी गेल्या काही वर्षांपासून सनी कलाविश्वात चांगलीच सक्रीय आहे. सिनेमा, म्युझिक अल्बम यांच्या माध्यमातून ती सातत्याने चर्चेत येत असते. मात्र, यावेळी ती उत्तर प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या परिक्षेमुळे चर्चेत आली आहे. या परिक्षेसाठी चक्क सनी लिओनीचं ॲडमिट कार्ड तयार झाल्याचं समोर आलं आहे. सध्या सोशल मीडियावर सनीचं हे ॲडमिट कार्ड व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशच्या महुआ जिल्ह्यातील धर्मेंद्र कुमार यांनी गेल्या २ वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी सुरू केली आहे. त्यानंतर, पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर ऑनलाईन अर्जही दाखल केला. पण, परीक्षेच्या प्रवेशपत्रावर चक्क बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा फोटो छापून आल्यामुळे युवकाला परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. त्यामुळे, गेल्या २ वर्षांपासून सुरू असलेली धर्मेंद्रकुमार यांची मेहनत वाया गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
धर्मेंद्रकुमार यांचे वडिल शेतकरी असून शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दोन मुलांपैकी धर्मेंद्र हा त्यांचा छाकटा मुलगा असून त्याने बीए परीक्षा पास केल्यानंतर पोलीस भरतीच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. मात्र, प्रवेशपत्रातील या चुकीमुळे धर्मेंद्रचे पोलीस भरतीचे स्वप्न भंगले आहे. याप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे विभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
धर्मेंद्रने महुबा येथील एका सायबर कॅफेतून पोलीस भरतीसाठीचा अर्ज केला होता. त्यानंतर, हॉल तिकीट आल्यानंतर त्यावर परीक्षा केंद्र कनौज लिहून आले. पण, प्रवेशपत्रावर फोटो आणि नाव सनी लिओनीचं लिहून आलं. त्यामुळे, धर्मेंद्र यांचं पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं. त्यामुळे, माझी पोलीस भरतीची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी धर्मेंद्र यांनी केली आहे.
उत्तर प्रदेश पोलीस कॉन्स्टेबलच्या ६०,२४४ पदांच्या भरतीसाठी दोन दिवसांची परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेसाठी असंख्य उमेदवार बसले होते. १७ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा अनेक केंद्रांवर घेण्यात आली. यामध्येच कनौज जिल्ह्यात एक हॉल तिकीट समोर आलं. या प्रवेशपत्रावर चक्क सनी लिओनीच्या नावाचं होतं. इतकंच नाही तर त्यावर फोटोदेखील तिचा होता. त्यामुळे, सध्या देशभरात सनी लिओनीची चर्चा रंगली. मात्र, याच तांत्रिक चुकीमुळे संबंधित युवकाची २ वर्षांची मेहनत वाया गेली आहे.
दरम्यान, या ॲडमिट कार्डनुसार, या उमेदवाराला उत्तर प्रदेशातील तिर्वा येथील श्रीमती सोनाश्री मेमोरियल गर्ल्स कॉलेजमध्ये परीक्षा द्यायची होती. उमेदवारांच्या यादीत या उमेदवाराचं नाव पाहिल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला. तसंच, कोणीतरी चेष्टा करण्याच्या हेतून हे केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, हे ॲडमिट कार्ड व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती बोर्डाकडून हे प्रवेशपत्र बनावट असल्याचं सांगितलं आहे.