नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच देशभरात एक लाख कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. एकट्या दिल्लीत २० हजार कोटींहून अधिक व्यवसायाची शक्यता असल्याचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) म्हटले आहे. देशातील ३० शहरांतील व्यवसायाची माहिती यासाठी संकलित करण्यात आली.
कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांच्या म्हणण्यानुसार, कॅटने ५० हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा अंदाज वर्तवला होता. परंतु देशभरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत असलेला प्रचंड उत्साह ही उलाढाल एक लाख कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. बाजारपेठांमध्ये राममंदिराचे चित्र असलेले झेंडे, पताका, टोप्या, टी-शर्ट आणि कुर्ता यांना मोठी मागणी आहे.
फिरोजाबादहून येणार दहा हजारांवर बांगड्याकाचेचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथून अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरास दहा हजारांवर बांगड्या भेट म्हणून येणार आहेत. प्राणप्रतिष्ठा समारंभात सहभागी महिलांना या बांगड्या भेट म्हणून देण्यात येणार आहेत.
कलाकारांची झाली बुकिंगप्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यासाठी संगीतरजनी पथक, ढोल-ताशा पथक, बँड, शहनाई वादन करणाऱ्या कलाकारांची बुकिंग झाली आहे. शोभायात्रेसाठी कारागीर व कलाकारांनाही मोठे काम मिळाले आहे. पणत्या व दिव्यांसह बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी रोषणाई, सजावटीच्या फुलांचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
राममंदिराच्या प्रतिकृतीही मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे. सध्याची मागणी पाहता देशभरात ५ कोटींहून अधिक प्रतिकृतींची विक्री होण्याची शक्यता आहे. प्रतिकृती तयार करण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये रात्रंदिवस काम सुरू असल्याचे खंडेलवालयांनी स्पष्ट केले.