Pm Modi on Uttar Pradesh Development: काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे वातावरण तयार होईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. याआधी सर्वत्र दंगे आणि चोरी, लुटमारीच्या बातम्या येत होत्या. पण आता याच राज्यात गुंतवणुकीच्या चर्चा रंगतात, अशा शब्दांत लखनौमधील यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची स्तुती केली. जेव्हा यूपीमध्ये गुंतवणूक येते तेव्हा मला खूप आनंद होतो. कारण सकारात्मक बदलाचा खरा हेतू साध्य होत असेल तर विकासाची गती कोणीही रोखू शकत नाही, याचे हे उत्तम उदाहरण आहे, असेही मोदी म्हणाले.
"गेल्या काही वर्षांत यूपीमधून होणारी निर्यात दुप्पट झाली आहे. वीजनिर्मिती असो किंवा पारेषण असो, आज यूपी प्रशंसनीय काम करत आहे. उत्तर प्रदेश हे सर्वात जास्त एक्सप्रेस वे असलेले राज्य आहे. या राज्यात नद्यांचे मोठे जाळे आहे, ज्याचा उपयोग माल वाहतुकीसाठी केला जात आहे. येथे दिसणारा विकास खूप व्यापक आहे. इतर देशांना भारताच्या विकासावर विश्वास आहे. विकसित भारतासाठी नवीन विचार आणि कल्पनांची गरज आहे. उत्तर प्रदेश या विकासात सकारात्मक पाऊल टाकत आहे," असा कौतुकाचा वर्षाव मोदींनी केला.
"२०१४ पूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर आकारला जात होता. आता 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. विकास भारत संकल्प यात्रेत आम्ही लाभार्थ्यांना त्यांच्या घराजवळ योजनांचा लाभ दिला. मोदींची हमी देणारे वाहन प्रत्येक गावात आणि शहरापर्यंत पोहोचले आहे, जेव्हा सरकारच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते, तेव्हा हा सामाजिक न्याय आहे. भ्रष्टाचार आणि भेदभावामुळे पूर्वी लोकांना रांगेत उभे राहावे लागत होते. ज्यांना कोणी विचारले नाही, त्यांची मोदी सरकार विचारपूस करतात", असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
"देशाची सेवा करण्यासाठी भगतसिंग शहीद झाले. तुम्ही देशासाठी तुमच्या कामातून देशसेवा घडवा. २०२५ मध्ये कुंभ आयोजित केला जाणार आहे, यूपीच्या अर्थव्यवस्थेसाठी ते खूप महत्वाचे असेल. यूपीमध्ये पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होणार आहेत. आपली ताकद मजबूत करा आणि नव्या भारताची कथा लिहा. भारताला उत्पादन क्षेत्रात जागतिक केंद्र बनवा आणि विकास करा," असा सल्ला मोदींनी उत्तर प्रदेशातील तरुणाईला दिला.